कोविड-१९ च्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील नेत्यांना परदेश दौऱ्यावर जाता आलेले नाही. मात्र २६-२७ मार्चला पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच हे वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली आहे.
हे ही वाचा:
सीएए-एनआरसी च्या मुद्द्यांवरून भारत बांगलादेश संबंध ताणले गेले होते. परंतु त्यानंतर भारतीय परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन चर्चा केल्या. आता खुद्द पंतप्रधानच कोविड-१९ नंतरचा पहिला परदेश दौरा बांगलादेशचा करून भारत बांगलादेश संबंधांचे महत्व अधोरेखित करत आहेत.
नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे ९० लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.