नवी दिल्लीतील एका वर्तमानपत्रात भारतातील अग्रगण्य अशा मोठ्या बोर्डिंग स्कूलच्या स्नेहसंमेलनाला येण्याचे आमंत्रण देणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यात दाखवण्यात आलेले बोर्डिंग स्कूलचे छायाचित्र हे १८व्या शतकातील जर्मनीतील राजवाड्याचे आहे.
‘बेलेवू पॅलेस’ म्हणून ओळखला जाणारा हा राजवाडा सध्या जर्मनच्या अध्यक्षांचे बर्लिनमधील अधिकृत निवासस्थान आहे.
भारत आणि भूतानमधील जर्मनचे राजदूत डॉ. फिलिप ऍकरमॅन यांनी या जाहिरातीत दाखवण्यात आलेली इमारत बोर्डिंग स्कूलची नव्हे तर जर्मनच्या अध्यक्षांचे बर्लिनमधील अधिकृत निवासस्थान असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियाद्वारे ही चूक दाखवून दिली आहे. ‘प्रिय भारतीय पालकांनो, मला ही जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात दिसली. परंतु ही बोर्डिंग स्कूलची इमारत नाही. तर, जर्मनच्या अध्यक्षांचे बर्लिनमधील अधिकृत निवासस्थान आहे. जसे आपल्याकडे राष्ट्रपती भवन आहे. जर्मनीमध्ये चांगली बोर्डिंग स्कूल आहेत. पण (वर्तमानपत्रात दाखवलेल्या छायाचित्रातील इमारतीत) यात कोणत्याही मुलाला प्रवेश दिला जात नाही,’ असे ऍकरमन यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.
हे ही वाचा:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले ‘ट्रॅप’
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक केले ‘ट्रॅप’
गोल्फपटू अदिती अशोकने रचला इतिहास!
त्यांच्या या पोस्टनंतर जाहिरातदारांनी प्रकाशित केलेल्या दिशाभूल करणाऱ्या छायाचित्राची अनेकांनी खिल्ली उडवत प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ‘राजदूत, तुम्ही भारतातील या फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या कार्यक्रम आयोजकांच्या व्यवसायात अडथळा आणत आहात,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर, दुसऱ्याने ‘त्यांनी किमान व्हाइट हाऊस तरी दाखवले नाही,’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत अद्याप कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.