दहशतवादाला पाठिंबा सुरू असेपर्यंत पाकिस्तानशी चर्चा अशक्य असल्याची भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अँनालेना बेरबॉक यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे. भारताच्या या भूमिकेला जर्मनीनेही सहमती दर्शवली आहे.
द्वीपक्षीय संबंधांवर जयशंकर आणि अँनालेना बेरबॉक यांची व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषदही झाली. त्यावेळी जयशंकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तानचे संबंध, सीमेवर असलेले दहशतवादाचे आव्हान यावर चर्चा झाली. सध्याचे मुख्य आव्हान हेच आहे की दहशतवादाला खतपाणी घातले जात असताना पाकिस्तानशी चर्चा केली जाऊ शकत नाही. यावर जर्मनीनेही सहमती व्यक्त केली. तसेच या चर्चेदरम्यान राजकीय देवाणघेवाण, वाढता व्यापार आणि गुंतवणूक यामुळे ही भागीदारी आणखी बळकट झाल्याचेही जयशंकर म्हणाले.
यावेळी जयशंकर यांनी रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यावरून भारताला लक्ष्य करण्याबद्दल युरोपिय महासंघाला खडे बोल सुनावले. ते म्हणाले, भारताची ऊर्जेची गरज आणि त्याचा प्राधान्यक्रम युरोपीय महासंघ ठरवू शकत नाही. युरोपने हवे तसे वागावे आणि भारताकडून वेगळी अपेक्षा ठेवावी हे कसे शक्य आहे. दहा देश मिळून रशियाकडून जेवढे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करतात त्यापेक्षा अधिक आयात एकट्या युरोपने केली आहे, अशा कानपिचक्या जयशंकर यांनी युरोपियन महासंघाला दिल्या आहेत.
हे ही वाचा :
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
संघाला विरोध मग पीएफआयच्या पाठीशी का?
महाविकास आघाडीचा नवा ‘उद्योग’; १७ डिसेंबरला सरकारविरोधात मोर्चा
‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’
तसेच अँनालेना बेरबॉक यांनी या भेटीगाठीचा दाखला देत द्वीपक्षीय संबंध दृढ झाल्याचा निर्वाळा दिला. सध्याच्या आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय परिस्थितीत दोन्ही देशांनी एकमेकांच्या सोबत उभे राहणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.