तामिळनाडूतील एलुसेम्पोन गाव सगळ्यांसाठी आदर्श गाव आहे. या गावाने काही कठोर नियम आपल्या गावकऱ्यांसाठी आखून दिले आहेत.
गेल्या चार दशकांपासून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास आणि विक्री करण्यास मनाई आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हे गाव तंबाखूमुक्त असून राज्यातील इतर गावांसाठी आदर्श बनले आहे. या गावातील आता पर्यंतच्या तीन पिढ्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत नाहीत.
तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील एलुसेम्पोन या गावात ५७० कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या २,७०० आहे. गावातील मोठ्या लोकांच्या सांगण्यावरून या गावात तंबाखू वापरण्यास बंदी आहे. गावातील काही लोकांना तंबाखू सेवन करायचे असेल तर गावाच्या सीमेबाहेर जाऊन त्याचे सेवन केले जाते. गावात येणाऱ्या बाहेरील लोकांनाही गावकरी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ न वापरण्याची विनंती करतात.
हे ही वाचा:
….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा
सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित
प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे
चाळीस वर्षांपूर्वी एक बिडीमुळे गावात आग लागली होती आणि अनेक गरीब गावकऱ्यांच्या घरांच नुकसान झालं होत. तेव्हापासून गावात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा घातलेल्या बंदीचे पालन आजही होत असल्याने तंबाखूमुक्त गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली आहे. गावात जागोजागी तंबाखू सेवनास बंदी अशा आशयाचे फलक लावलेले आहेत, अशी माहिती डिजिटल वजन काटा (weighbridge) चालवणारे पी. पुष्पराज यांनी सांगितले.
गावातील काही लोक या निर्णयाविरुध्द बोलत असतात, पण आम्ही आमच्या मताशी ठाम असल्याचे गावकरी सांगतात. ज्या लोकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करायचे आहे असे लोक गावाबाहेर जाऊन सेवन करतात, असे एका दुकानदाराने सांगितले.