लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २,८०० लोक जखमी झाले आहेत. या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरु आहे. पाच महिने आधी लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या तैवान-निर्मित पेजरमध्ये स्फोट झाला. इस्रायली लोकेशन ट्रॅकिंग टाळण्याच्या प्रयत्नात हिजबुल्लाहचे दहशतवादी संवादाचे लो-टेक साधन म्हणून पेजर वापरत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात पेजर तयार करणारी गोल्ड अपोलो या तैवानमधील कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष हसू चिंग कुआंग यांनी हा स्फोट ज्या उत्पादनांमध्ये झाला ती उत्पादने आमची नव्हती. त्या उत्पादनांसाठी फक्त आमचे ब्रँड नाव वापरले गेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तैवानच्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, बॉम्बस्फोटात वापरलेली उपकरणे ही बीएसी नावाच्या युरोपियन कंपनीने बनवली होती ज्यांच्याकडे तैवान कंपनीचे ब्रँड नाव वापरण्याचा परवाना आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. आम्ही फार मोठी कंपनी नाही, पण आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत. हे अतिशय लाजिरवाणे आहे, अशी प्रतिक्रिया हसू चिंग कुआंग यांनी दिली आहे. पेजर्समध्ये नेमकी स्फोटकं कशी तयार केली जातात याबद्दल काहीच माहिती नसल्याचंही कंपनीच्या प्रमुखांनी सांगितलं.
हे ही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प घेणार पंतप्रधान मोदींची भेट; मोदी ‘फँटास्टिक नेते’ म्हणत काढले गौरवोद्गार!
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट
जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सनातन धर्म…पुस्तकाची कहाणी पॉडकास्टच्या रूपात लवकरच येणार समोर, टीझर जारी
लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २,८०० लोक जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह सदस्य आणि इतरांनी संवादासाठी वापरलेल्या पेजरमध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान स्फोट झाले. पेजरमधील मालिका बॉम्बस्फोटांच्या तपासासाठी हिजबुल्लाहने पथके तैनात केली आहेत. पेजर स्फोटाच्या घटनेनंतर जखमींच्या मदतीसाठी रुग्णालयात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संस्थेने स्फोटाच्या पाच महिने आधी लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या ५ हजार तैवान-निर्मित पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके पेरली होती, असा दावा लेबनॉनकडून केला जात आहे.