मागील तीन-चार दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजुने प्राणघातक हल्ले केले जात असून अनेक निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला आहे. शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली असून दोन्ही बाजूने हल्ले सुरू झाले आहेत.
अशातच अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरण्याची घोषणा केली आहे. शिवाय युद्धनौका आणि लढाऊ विमानेही अमेरिकेने इस्रायलच्या मदतीला पाठवून दिली आहेत. या सर्व घडामोडीनंतर अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने संयुक्त निवेदन जारी करत इस्रायला पाठिंबा दिला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो, असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तर, इराण, कतार हे देश पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले आहेत.
अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, “फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो. हमासच्या दहशतवादी कृत्यांना कोणतंही समर्थन नाही. त्यांची कृती कायदेशीर नाही. त्यामुळे त्यांचा सर्वत्र निषेध केला गेला पाहिजे. दहशतवादाला कधीही समर्थन दिलं जाऊ शकत नाही.”
“अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असून संपूर्ण जग भयभीत झालं आहे. कारण हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून कुटुंबांची हत्या केली. संगीत महोत्सवाचा आनंद घेत असलेल्या २०० हून अधिक तरुणांची कत्तल केली,” असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
हे ही वाचा:
अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त
भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत
अपघातातील मृताचे शव कालव्यात टाकले; बिहारमधील तीन पोलिस निलंबित
श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेपासून इस्त्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांनी आतापर्यंत ५ हजारहून अधिक रॉकेट हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यावर प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. दरम्यान, शनिवार ते सोमवारपर्यंत गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादच्या ५०० हून अधिक ठिकाणांवर इस्राईलने हल्ले केले आहेत.