या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

या राज्यालाही द्या, भारतीय हॉकीच्या यशाचे श्रेय!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष हॉकीकडे वळवले. या दोन्ही संघांच्या यशात या खेळाडूंची मेहनत, त्यांच्या प्रशिक्षकांनी उपसलेले कष्ट यांचे श्रेय आहेच पण एक राज्याचाही या यशात सिंहाचा वाटा आहे.

भारतीय पुरुष संघाने तब्बल ४१ वर्षानंतर हॉकीमध्ये कांस्य पदक मिळवले. महिला संघानेही कांस्य पदकासाठी दमदार कामगिरी केली, परंतु त्यांचे पदकाचे स्वप्न अपुरेच राहिले. भारताच्या हॉकी संघामागे तटस्थपणे उभे आहेत ते म्हणजे ओदिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. भारताच्या प्रत्येक नागरिकाला हॉकी खेळाची आवड निर्माण करण्यामागे पटनाईक यांचा मोलाचा वाटा आहे.

२०१८ पासून ओदिशा राज्य हे सर्वच गटातील भारतीय पुरुष आणि महिलांच्या हॉकी संघांसाठीचे प्रायोजक आहेत. नवीन पटनाईक हे त्यांच्या शाळेत हॉकी खेळायचे. त्यांची ही आवड भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी फायद्याची ठरली. २०१८ मध्ये ओदिशा राज्याने हॉकी इंडियासोबत पाच वर्षांचा १४० कोटी रुपयांचा करार केला होता. ओदिशा फक्त स्पॉन्सरशिप देत नाही, तर खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण, सरावासाठी खेळपट्ट्या उपलब्ध करून देणे तसेच स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना घडवण्याचे कामही करत असते. भारतीय हॉकी संघाची परिस्थिती वाईट असताना ओदिशा राज्य त्यांच्या पाठीशी उभं राहिले. २०१८ मध्येच ओदिशाने पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाचे आयोजन केले होते.

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर नवीन पटनाईक यांनी खेळाडूंशी संवाद साधताना खेळाडूंचे अभिनंदन केले. भारत खूप उत्साहात आहे आणि ओदिशाही खूप उत्साहात आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. असे ते म्हणाले. “हा क्षण आमच्यासाठी खूप विशेष आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत. या संपूर्ण प्रवासात पाठिशी उभे राहिल्याबद्दल त्यांचे आभार.” असे मत भारतीय पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने व्यक्त केले. सगळेजण क्रिकेटला पाठींबा देत होते, पण पटनाईक यांनी हॉकीला निवडले आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. पुन्हा त्यांचे आभार असेही कर्णधार पुढे म्हणाला.

Exit mobile version