डिझेलची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे या हेतूने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. एसटी महामंडळ राज्यात दोन हजार विजेवर धावणाऱ्या बस चालवणार आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि नांदेडसाठी १५० गाड्यांचे नियोजन केले आहे. विभाग नियंत्रकांना २००० गाड्यांचे नियोजन करण्याचे आदेश उपमहाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
या इलेक्ट्रिक बसची वाहन वापर क्षमता ४०० किलोमीटरची असून ३०० किलोमीटर अंतरावर चार्जिंगची व्यवस्था केली जाणार आहे. ३०० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर वाहनाला चार्ज करणे बंधनकारक असेल. औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणची चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा:
महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या गुंडगिरीचा अडसर
अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट
महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार
अखंड भारत संकल्प दिन म्हणजे नेमके काय रे भाऊ?
या बससाठी असलेला परवाना, रस्ते कर व टोल शुल्क, उच्चदाबाची विद्युतवाहिनी आगारापर्यंत आणण्याचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. चार्जरची मालकी ही पुरवठादाराची असणार आहे. मात्र बससाठी वाहक एसटी महामंडळ पुरवणार आहे.
एसटी महामंडळाने औरंगाबाद विभागासाठी ३८९ गाड्या, मुंबई विभागासाठी ३६९ गाड्या, नागपूर विभागासाठी २१७ गाड्या, पुणे विभागासाठी ५१२ गाड्या, नाशिक विभागासाठी ३५३ गाड्या, अमरावती विभागासाठी १६० गाड्यांचे नियोजन केले आहे.