कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यावर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केले. १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना रेल्वे प्रवास करण्यासाठी मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, पण हा प्रवास कागदोपत्री करणे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्यांना क्युआर कोड देण्यात येणार असून त्याच्या आधारे रेल्वे तिकीट प्रवाशांना काढता येतील. रेल्वे प्रवासाठी विशेष बनवण्यात येणारा ऍप हा कोविन ऍपला जोडलेला असणे आवश्यक आहे, तरच खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ऍपचा वापर केला जाणार नाही. लशीच्या प्रमाणपत्रावर फोटो नाही त्यामुळे फोटो अपलोड करण्याची सुविधा असावी असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
झोनल रेल यूझर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य शैलेश गोयल यांचे म्हणणे आहे की, मी यासंदर्भात काही सूचना मांडल्या होत्या, पण त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान तयार नाही. त्यामुळे ज्यांनी दोन लसी घेतलेल्या नाहीत त्यांना रोखणे कठीण आहे.
रेल्वे पासवरील क्युआर कोड हा मोबाईलमधील स्कॅनरच्या मदतीने तिकीट तपासनीस तपासतील. सरकारचा ऍप अजून तयार नसेल तर पालिका रेल्वे स्थानकांबाहेर प्रमाणपत्र तपासणीकरिता अधिकाऱ्यांची नेमणूक करेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देणे हा निर्णय योग्य असल्याचे मत महामारी आणि आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरीया यांनी मांडले. लोकांना आवश्यक ती काळजी घेत पुन्हा सुरळीतपणे आयुष्य जगता येत नसेल तर दोन डोस घेऊन तरी काय फायदा. पहिला डोस घेतलेल्यांनाही प्रवासासाठी परवानगी द्यावी कारण दुसरा डोस ते लवकरच घेणार आहेत असेही डॉ. लहरिया म्हणाले.
हे ही वाचा:
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा
काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?
‘त्या पाच वर्तुळांचे दडपण नेहमीच असते’
राज्य सरकारच्या या योजनेला भाजपने विरोध केला आहे. रेल्वेत प्रवाशांना प्रवेश देणारी ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ही योजना कागदावर सोपी आहे पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे कठीण होणार आहे असे काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.