अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता हळूहळू त्यांनी कायदे आणि नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुलींना शिक्षण घेता येईल, मात्र मुलांसोबत एकत्र शिक्षण घेता येणार नाही हे तालिबानने स्पष्ट केले. आता खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या महिलांनी नकाब परिधान करणे अनिवार्य असेल, असा आदेश तालिबान्यांनी दिला आहे. मुली आणि मुले यांचे वेगवेगळे वर्ग भरतील आणि तसे शक्य न झाल्यास वर्गात दोन भाग करून मध्ये पडदा लावण्यात येईल. मुलींना शिकवायला महिला शिक्षकच असतील. महिला शिक्षक उपलब्ध नसल्यास वयस्कर चांगल्या वर्तणुकीच्या शिक्षकाची नेमणूक करता येऊ शकेल, असे आदेश तालिबानी शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
२००१ मध्ये तालिबानी सत्ता संपुष्टात आल्यानंतर काही खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठ यांचा चांगला विकास झाला होता, अशा सर्वांना हा आदेश लागू असणार आहेत. १९९६ – २००१ मध्ये तालिबानी सत्ता असताना महिलांवर बंधने लादण्यात आली होती. मुलींचे शिक्षण बंद करण्यात आले होते. महिलांना काम करण्यास आणि एकटीने प्रवास करण्यास बंदी होती. त्या केवळ घरातील पुरुषाच्या सोबतीनेच घराबाहेर पडू शकत होत्या. शनिवारी तालिबान्यांनी प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमावलीनुसार महिलांना बुरखा घालण्याचे बंधन नसेल; मात्र नकाब परिधान करावाच लागेल. निकाबमुळे डोळे सोडून संपूर्ण चेहरा झाकला जाईल. काबूल सारख्या शहरातून बुरखा आणि नकाब जवळजवळ नाहीसे झाले होते. छोट्या शहरात आणि गावात काही ठिकाणी महिला ही वस्त्र परिधान करत असत.
हे ही वाचा:
बेळगावात कमळाला कौल; शिवसेनेचे समर्थन असलेले उमेदवार पराभूत
मिळाला एका महिन्याचा पगार तोही ९८००; काय करावे एसटी कर्मचाऱ्याने?
या ‘कल्पनाशक्ती’ला दाद द्यावी तेवढी कमी!
सोमवारपासून खासगी विद्यापीठे सुरू करण्याची तयारी करत असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. विद्यापीठातील मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षकांची भरती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठात प्रवेश करताना आणि नंतर बाहेर पडताना मुलींनी आणि मुलांनी वेगवेगळे मार्ग वापरावेत. महिला शिक्षकांची भरती करणे शक्य नसल्यास मुलींना शिकवण्यासाठी वयस्कर चांगल्या वर्तणुकीच्या शिक्षकाची शिफारस करावी, असे आदेशात म्हटले आहे.
वर्ग सुटताना महिलांचे वर्ग पाच मिनिटे आधी सोडण्यात यावे जेणेकरून त्या विद्यापीठाबाहेर मुलांमध्ये मिसळू शकणार नाहीत. तसेच सर्व मुले इमारतीमधून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्यांनी प्रतिक्षागृहात थांबावे, असे आदेशात म्हटले आहे. प्रत्यक्षात ही योजना कठीण आहे, कारण विद्यापीठात तेवढ्या महिला शिक्षिका आणि वर्ग उपलब्ध नाहीत. पण मुलींना शाळेत आणि विद्यापीठात शिकायला मिळत आहे हे एक सकारात्मक पाउल असल्याचे एका प्राध्यापकांनी सांगितले.