भारताचा शेजारी देश पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना पाकिस्तानच्या या आर्थिक समस्येला अधोरेखित करणारा एक अहवाल समोर आला आहे. भारताच्या टाटा समूहाने संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, टाटा समूहाच्या कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्याने पाकिस्तानच्या सकल देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) मागे टाकले आहे. टाटा समूहाचे मार्केट कॅप ३६५ अब्ज डॉलर किंवा ३०.३० लाख कोटी रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफच्या अहवालानुसार, पाकिस्तानचा जीडीपी ३४१ अब्ज डॉलर आहे. म्हणजेचं एकटा टाटा समूह हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे. भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आकार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत जवळपास निम्मा आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मार्केट कॅप १७० अब्ज डॉलर आहे. गेल्या एका वर्षात टाटा कंपन्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे.
सर्व टाटा समूहाच्या कंपन्यांनी समूहाच्या एकूण बाजारमूल्यात वाढ होण्यास हातभार लावला आहे. सर्वात मोठे योगदान टाटा मोटर्स आणि ट्रेंटमधील मल्टीबॅगर परताव्याच्या रूपात आले आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या एका वर्षात ११० टक्क्यांनी वाढले आहेत, तर ट्रेंटने तब्बल २०० टक्क्यांची वाढ केली आहे. टाटा समूहाच्या स्टॉक एक्स्चेंजवर किमान २५ कंपन्या सूचीबद्ध आहेत. परंतु, या केवळ समूहाच्या सूचीबद्ध कंपन्या आहेत. टाटा समूहाच्या अंतर्गत अनेक असूचीबद्ध कंपन्या आहेत. ज्यात टाटा सन्स, टाटा कॅपिटल, टाटा प्ले, एअर इंडिया सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जर या व्यवसायांचा विचार केला तर टाटा समूहाच्या एकूण बाजार भांडवलात लक्षणीय वाढ होईल.
पाकिस्तानवरील आर्थिक संकट
सध्या पाकिस्तान त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. १२५ अब्ज डॉलर्सचे बाह्य कर्ज आणि दायित्वे यांच्याशी सामना करत असलेल्या देशावर जुलैपासून सुरू होणाऱ्या एकूण २५ अब्ज डॉलर आगामी बाह्य कर्जाच्या पेमेंटसाठी निधी सुरक्षित करण्याचा दबाव आहे. याशिवाय, पाकिस्तानचा ३ अब्ज डॉलरचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रम पुढील महिन्यात संपणार आहे, ज्यामुळे त्याच्या आर्थिक आव्हानांमध्ये आणखी भर पडणार आहे.
हे ही वाचा:
नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर
चंदीगडच्या भाजपा महापौरांचा पदाचा राजीनामा; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
उत्तर प्रदेश: पंतप्रधान मोदींनी कल्की धाम मंदिराची केली पायाभरणी!
“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”
पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत ११ पटीने लहान आहे. सध्या देशाचा जीडीपी सुमारे ३.७ अब्ज डॉलर आहे. जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.