अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू असतानाच १ फेब्रुवारी, १९८६ रोजी जन्मभूमीचे टाळे उघडून पूजा करण्याचा निकाल देणारे फैजाबाद (आता अयोध्या)चे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश कृष्णकुमार पांडेय यांच्या आठवणींना उजळा दिला जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ राजकीय वाद उफाळून आला नाही तर, पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांमधून त्यांच्या लखनऊ येथील घरात धमकीची पत्रेही येत असत.
पांडेय यांची मुलगी डॉ. मधु पांडेय यांनी अधिक माहिती दिली. ‘वडिलांना शेकडो धमकीची पत्रे मिळूनही ते घाबरले नाहीत. मात्र केजीएमसीमध्ये मेडिकलच्या शिक्षणादरम्यान जेव्हा लोकांना माझ्याबद्दल समजले तेव्हा एका वर्गाने खूप त्रास दिला. त्यामुळे काही पेपर सोडण्याची वेळ आली. मात्र वडिलांनी तो निर्णय कोणत्यारी राजकीय दबावाने घेतला नव्हता. ते प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांच्या विरोधात होते. जेव्हा ते फैजाबादचे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांनी ४० वर्षे जुना हा खटला पटलावर आणला. तेथील गॅझेटियरपासून ते जुने साक्षीपुराव्यांचा तीन ते चार महिने अभ्यास केला. सारे पुरावे त्यांनी स्वतः मिळवले होते,’ असे त्यांची मुलगी डॉ. मधु पांडेय यांनी सांगितले. त्यांची बढती सन १९९०मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून होणार होती. परंतु तत्कालीन उत्तर प्रदेशच्या सरकारमुळे ते शक्य झाले नाही, असे त्यांचा पुतण्या सुजीत पांडे यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर, त्यांना लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत रथावर स्वार होण्याचीही संधी मिळाली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावली. त्यानंतर सन २०२२मध्ये गोरखपूर नगरनिगमने कृष्ण मोहन पांडेय (वॉर्ड नंबर ६५)च्या नावाने नवा वॉर्ड स्थापन केला. गेल्या वर्षीची निवडणूक याच नावाने झाली. त्यांचे सन २०००मध्ये निधन झाले.
हे ही वाचा:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण
ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांच्या घरात ईडी
‘ईजमायट्रिप’ने स्थगित केल्या मालदिवच्या सर्व विमानाचे बुकिंग!
मराठा आंदोलकांना लगाम घालण्यासाठी याचिका
पुस्तकात कथन केला प्रसंग
कृष्णकुमार पांडेय यांनी १९९१मध्ये ‘अंतरात्मा की आवाज’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यात त्यांनी लिहिले की, जेव्हा ते टाळे उघडण्याचा आदेश देत होते तेव्हा एका माकडाच्या रूपात त्यांना बजरंगबलीचे दर्शन झाले. त्यांच्या न्यायालयाच्या छतावर एक काळे वानर संपूर्ण दिवस फ्लॅग पोस्ट पकडून होता. निर्णय सुनावल्यानंतरच हे माकड तिथून निघून गेले. त्यानंतर ते माकड या न्यायाधीशांच्या घरातील अंगणातही दिसले. ते वाहून न्यायाधीश खूप आश्चर्यचकीत झाले. त्यांनी त्या वानराला वंदन केले.