कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेल्या नवीन रेल्वे प्रवासासाठीच्या नियमावलीमुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दीत वाढ झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदर्श कार्यप्रणालीमध्ये रेल्वे स्थानकांची प्रवेशद्वारे उघडण्यासंबंधी काहीही तरतूद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
रेल्वे प्रवासाला मुभा मिळाली आहे, परंतु स्थानकावर पोहचण्यासाठी असलेली बहुतांश प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली आहेत. दहिसर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या चार पैकी तीन प्रवेशद्वारे सध्या बंद आहेत. एकच प्रवेशद्वार सध्या खुले असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी प्रवेशद्वाराकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होते, अशी तक्रार प्रवासी करत आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरच रिक्षा चालकांची गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
हे ही वाचा:
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार बंद आहेतच त्यात अजून भूमिगत रस्ताही (सब-वे) बंद असल्याने स्थानकावरील पादचारी पूल गाठण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. स्टेशनमास्तरांकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही, असे लीना नाईक या प्रवासी महिलेने सांगितले. म्हात्रेवाडी रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद दिघे यांनीही या प्रकरणाबद्द्ल स्टेशनमास्तरांकडे तक्रार केली. सरकारने दिलेल्या आदर्श कार्यप्रणालीमध्ये रेल्वे स्थानकाची प्रवेशद्वारे उघडण्याच्या सूचना नाहीत. त्यामुळे ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली आहेत, असे दहिसर रेल्वे स्थानकाचे अधिक्षक अमोल अंबरे यांनी सांगितले.