युक्रेनविरुद्ध रशियाचे युद्ध सुरूच आहे. दरम्यान, आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ९० मिनिटे चर्चा झाली आहे.
यानंतर मॅक्रॉन म्हणाले की “पुतिन यांना संपूर्ण युक्रेन काबीज करायचे आहे. त्यामुळे येणारा काळ युक्रेनसाठी सर्वात वाईट काळ असणार आहे,” मॅक्रॉनच्या जवळच्या सहाय्यकाने ही माहिती दिली आहे. रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर पुतिन आणि मॅक्रॉन यांच्यात दोन वेळा संवाद झाला आहे.
रशियन सैन्य युक्रेनमधील कीव, खारकीव आणि चेर्निहाइव्हसह अनेक शहरांवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेनमधील उत्तरेकडील चेर्निहाइव्ह शहरात रशियाने केलेल्या हल्ल्यात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या एका मोक्याच्या बंदरावर कब्जा केला आहे आणि दुसऱ्या बंदराला वेढा घातला आहे.
या हल्ल्या दरम्यान, बेलारूस सीमेवर रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी भेटले होते. या बैठकीत युक्रेनने रशियासोबतचे युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी केली होती. यासोबतच शहरांमध्ये अडकलेल्या सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सांगितले. या युद्धात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि दहा लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनच्या सीमा सोडल्या आहेत. युद्ध सुरु झाल्यापासून रशियन सैन्याने कीव वर लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
शतकांच्या कसोटी यज्ञांतून उठली विराट ज्वाला
युक्रेनचे सर्वात मोठे मालवाहू विमानही हल्ल्यात उद्ध्वस्त
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनने ताबडतोब नाटोमध्ये सामील होण्याचा प्रयत्न सोडून स्वतःला तटस्थ घोषित करावे, असा इशारा दिला आहे. युक्रेनचे पश्चिमेकडे वळणे मॉस्कोसाठी धोक्याचे आहे, असे पुतीन बराच काळ सांगत आहेत.