भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील तणाव वाढत असतानाच आता खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असे वृत्त कॅनडामधील एका वृत्तपत्राने दिल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर भारताकडून या बातमीमधील दावा फेटाळून लावण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, सदर वृत्तपत्रातील विधान हास्यास्पद असून आम्ही हा दावा फेटाळून लावत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या कटाची माहिती होती, असा आरोप कॅनडातील वृत्तपत्र ‘द ग्लोब’ आणि ‘मेल’ या वृत्तपत्राने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने बातमीत केला होता. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात अशा माध्यमांच्या बातम्यांना हास्यास्पद म्हणत हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही सामान्यतः मीडिया रिपोर्ट्सवर भाष्य करत नाही. पण, कॅनडाच्या सरकारी स्रोताने वृत्तपत्राला दिलेली अशी हास्यास्पद विधाने फेटाळण्यासारखीच आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले. रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या दाव्यांमुळे भारत आणि कॅनडा यांचे पूर्वीच ताणलेले संबंध आणखी खराब होतात.
एका अज्ञात कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देऊन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, हत्येचा कथित कट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रचला होता आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या योजनेची माहिती देण्यात आली होती. अहवालात असेही म्हटले आहे की, कॅनडाकडे पंतप्रधान मोदींच्या विरोधात या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी
युपीआयचा वापर, कृषी, औषध निर्मितीसह भारत- गयाना यांच्यात १० सामंजस्य करार
सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला
गेल्या वर्षी, भारत- कॅनडा राजनैतिक संबंध अत्यंत ताणले गेले जेव्हा कॅनडाने हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांचा सहभाग असल्याचे म्हटले. यानंतर भारताने कडक पावले उचलत कॅनडामधील भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांना तातडीने कॅनडा सोडून भारतात येण्याचे आदेश दिले होते. शिवाय कॅनडाकडे वारंवार पुरावे मागूनही त्यांनी ते कधीही सादर केले नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले होते की त्यांच्याकडे भारताविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. दरम्यान, कॅनडाच्या पोलिसांनी दावा केला होता की, भारत सरकारने कॅनडामध्ये गुन्हेगारी कृत्ये घडविण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईचा वापर केला. हे सर्व दावे भारताने कायम फेटाळून लावले असून यात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत.