कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नात घट झाल्यामुळे सगळ्या महापालिकांमध्ये अडचणीची स्थिती आहे.
कोरोना संकटामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोना काळात पालिकेला मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून आर्थिक दिलासा मिळत आहे, पण तरीही इतर विभागांच्या उत्पन्नात अजून अपेक्षित वाढ झालेली नाही. महापालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार वगळता पाणी खरेदी, रस्ते सफाई आणि इतर आवश्यक कामांसाठी दरमहा ३० कोटी खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत पालिकेकडे केवळ ४० कोटी शिल्लक आहेत. ठेकेदारांची ८०० कोटी रुपयांची देयके द्यायची कशी, असा प्रश्न पालिकेसमोर उभा आहे.
मागील वर्षी मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठणे पालिकेला शक्य झाले होते. मात्र इतर विभागातून कराची अपेक्षित वसुली झाली नव्हती, त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. आर्थिक अडचणींमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १३०० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये विभागांना वसुलीचे उद्दिष्ट कमी ठरवून देण्यात आले आहे. तरीही मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
नारायण राणे यांचं काही चुकलं नाही
मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही
महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर
राज्य शासनाकडून पालिकेला दरमहा वस्तू आणि सेवा करातून ७६ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. या रकमेतून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. अधिकारी आणि कर्मचारी पगारावर सुमारे ७५ कोटी रुपये खर्च होतात. त्यातच पाणी खरेदी, रस्ते सफाई आणि इतर आवश्यक कामांवर महिन्याला ३० कोटी खर्च करावे लागतात. सध्या पालिकेकडे फक्त ४० कोटी शिल्लक असून पालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याचे चित्र आहे.