मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे भारतात न येण्यासाठीच्या सर्व पळवाटा बंद झाल्या असून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची त्याची विनंती फेटाळून लावली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तहव्वूर राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, तहव्वूर राणाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले असून तो उद्या (गुरुवारी) सकाळी भारतात येण्याची शक्यता आहे. यासंबंधीचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
तहव्वूर राणा याला घेऊन एक विशेष विमान येत असून नवी दिल्लीला पोहोचण्यापूर्वी ते विमान इंधनासाठी एका ठिकाणी थांबेल, अशी माहिती आहे. अमेरिकेच्या न्यायालयाच्या शिफारशींनुसार, दिल्ली आणि मुंबईतील दोन तुरुंगांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राणा येथे पोहोचल्यानंतर त्याला नवी दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात कोठडीसाठी हजर केले जाईल. मुंबई गुन्हे शाखेला त्याची कोठडी नंतर मिळेल, असेही त्यांनी सांगितले. एनआयए आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी हे प्रत्यार्पणाच्या मोहिमेवर बारकाईने देखरेख करत आहेत.
मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा हा त्याचे भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी सातत्याने पळवाटा शोधत होता. अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेने आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतरही तहव्वूर राणा न्यायालयाची दारे ठोठावत होता. ६ मार्च रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी त्याची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतरही तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी आणखी एक याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिकाही फेटाळण्यात आली आणि त्याचा भारतात प्रत्यार्पण होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हे ही वाचा :
सर्वसामान्यांना दिलासा; सलग दुसऱ्यांदा रेपो दरात ०.२५ टक्के कपात
अमेरिकेने दणका देताचं चीनला आठवले, “हिंदी चीनी भाई भाई”
श्रेयस अय्यर – मार्च महिन्याचा खरा सुपरस्टार
“‘बस नाम ही काफी है’ – पण प्रदर्शन कुठं आहे, मुंबई?”
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी- अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.