जम्मूच्या राजौरीमधील चकमकीत २ जवान शहीद, ४ जखमी

सात तासांपासून चकमक सुरु

जम्मूच्या राजौरीमधील चकमकीत २ जवान शहीद, ४ जखमी

जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील कांडी भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले असल्याची माहिती लष्कराने  दिली आहे. दहशतवाद्यांकडून हा घातपात केला गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजौरी भागात शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून ही चकमक सुरु झाली असून गेल्या सात तासांपासून ती कायम आहे. दोन्ही बाजुंनी जोरदार गोळीबार करण्यात येत आहे. या भागात लष्कराने दहशतवाद्यांच्या २-३ गटांना घेरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या आठवड्यात पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला करण्यात आला होता. दशत्वाद्यानी केलेल्या स्फोटात त्यावेळी लष्कराचे ५ जवान शाहिद झाले होते. या हल्ल्यामध्ये याच दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. राजौरीच्या चकमकीमध्ये दहशतवादीही मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी जवानांना कमांड हॉस्पिटल उधमपूरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील थन्नामंडी आणि दारहाल तालुक्यांतील घनदाट जंगलात चार ते सहा दहशतवादी सक्रियपणे फिरत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवरून शोध मोहीम सुरू केली. परगलच्या जंगलात चार ते सहा दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
संयुक्त पथके संशयित ठिकाणी पोहोचताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, प्रत्युत्तर देत चकमक सुरू झाली. यात जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाने परिसरात घेरले आहे. अजूनही चकमक सुरूच आहे.

हे ही वाचा:

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

त्याआधी गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी मार्च महिन्यात दहशतवादि संघटनेत सामील झाले होते. याआधी बुधवारी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या माछिल भागात दोन घुसखोरांना कंठस्नान घालून त्यांचा प्रयत्न हाणून पडला.

Exit mobile version