भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील ग्वादर बंदरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूक आणि स्फोटके घेऊन काही हल्लेखोरांनी ग्वादर बंदराच्या परिसरात बेछूट गोळीबार सुरू केला. बंदराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलानेही या हल्ल्याला तात्काळ प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला केला. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये आठ हल्लेखोर मारले गेले आहेत.
पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने उभारल्या जाणाऱ्या ग्वादर बंदर प्राधिकरणावर (GPA) बुधवारी संध्याकाळी दहशतवादी हल्ला झाला. ग्वादरमधील संकुलात अनेक स्फोट आणि गोळीबार झाले. येथे एक पासपोर्ट ऑफिसही आहे. या स्फोटात ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. बंदराच्या आवारात जोरदार गोळीबार आणि स्फोट घडून आल्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरून गेला. ग्वादर बंदरावर चीनच्या भागीदारीत अनेक कामं सुरू आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्यादृष्टीने ग्वादर बंदर महत्त्वाचे आहे. बीजिंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिटिव्हच्या अंतर्गत ग्वादर बंदराचा विकास केला जात आहे.
लष्कराने आतापर्यंत आठ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात मारले गेलेले आठ जण हे बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या बलुचिस्तानच्या प्रतिबंधित संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानने बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मशी संबंधित असलेल्या माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या बंदरावर मोठ्या संख्येने चीनी कर्मचारीदेखील काम करत आहेत. चीनचे नागरिक काम करत असलेल्या प्रकल्पस्थळांना याआधीही अनेकडा पाकिस्तानी अतिरेक्यांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये काही हल्लेखोरांनी ग्वादरमधील चीनी नागरिकांच्या एका पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील चीनच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा:
जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!
आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!
नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?
तुम्ही उतरलात तरी घडायचे तेच घडणार !
या हल्ल्यानंतर बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सर्फराझ बुग्टी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आठ अतिरेक्यांनी ग्वादर पोर्ट प्राधिकरणाच्या आवारात घुसून हल्ला केला. सुरक्षा दलाने आठही जणांचा खात्मा केला आहे. जो कुणी अतिरेकी हल्ल्याचा मार्ग स्वीकारेल, त्याचा अशाचप्रकारे खात्मा केला जाईल, हा संदेश यामाध्यमातून आम्ही देऊ इच्छितो. पाकिस्तानसाठी ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अतिरेक्यांना कंठस्नान घातले, त्यांचे आभार व्यक्त करतो.”