पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

२३ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस अडवत ओळख विचारून प्रवाशांवर झाडल्या गोळ्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २३ जण ठार झाले आहेत. बलुचिस्तानमधील मुसाखेल जिल्ह्यात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी वाहने थांबवून लोकांवर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सहाय्यक आयुक्त मुसाखाइल नजीब काकर यांच्या हवाल्याने पाकिस्तानमधील वृत्तसंस्था ‘डॉन’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, मुसाखेलच्या राराशम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आंतर-प्रांतीय महामार्ग रोखला. या मार्गावरून जाणारी बस अडवत दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. यानंतर त्यांची ओळख विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यामध्ये दहशतवाद्यांनी २३ प्रवाशांवर गोळ्या झाडल्‍या. पंजाबला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची दहशतवाद्यांकडून तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधील व्यक्तींची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सर्व मृत पाकिस्‍तानमधील पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. या हल्‍यानंतर दहशतवाद्यांनी दहा वाहनेही जाळली, अशी माहिती स्‍थानिक पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

या दहशतवादी घटनेमागे बीएलए (बलुच लिबरेशन आर्मी) दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीएलए हा प्रदेशातील सर्वात सक्रिय अतिरेकी फुटीरतावादी गट आहे. प्रतिबंधित बलुच लिबरेशन आर्मीने लोकांना हायवेपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, या हल्ल्यामागील जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांनी अनेकदा देशाच्या पूर्व पंजाब भागातील कामगार आणि इतरांना प्रांत सोडण्यास भाग पाडण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून ठार मारले आहे.

हे ही वाचा :

युक्रेनचा रशियातील मोठ्या इमारतीवर ड्रोन हल्ला, चार जखमी !

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी ४४ उमेदवारांची यादी जाहीर

हद्दच झाली! बांगलादेशातील पूर भारतामुळे आला म्हणत मंदिराची तोडफोड

नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सर्फराज बुगती यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्‍यक्‍त केला आहे. मुसाखैलजवळ निरपराध प्रवाशांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी क्रूरता दाखवली. दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार यांचा खात्‍मा निश्‍चित आहे, असे पाकिस्तानचे केंद्रीम माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी म्‍हटलं आहे.

Exit mobile version