लष्कर ए तय्यबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय सेनेने अटक केली आहे. अली बाबर पात्रा असे त्याचे नाव असून तो अवघ्या १९ वर्षांचा आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ओखरामध्ये राहणारा हा तरुण आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. त्याने अनेक धक्कादायक गोष्टींची कबुली यानंतर दिली आहे.
तो म्हणाला की, मला यासाठी २० हजार रुपये देण्यात आले होते. याशिवाय माझ्या कुटुंबियांना ३० हजार देण्यात आले. आयएसआयने मला पैसे पुरविले. पाकिस्तानातून हत्यारं पुरविण्यासाठी मी भारतात आलो. आपले ट्रेनिंग पाकिस्तानात झालेले आहे, असेही त्याने म्हटले आहे.
अली बाबर म्हणतो की, तो गेल्या १० दिवसांपासून उरीमध्ये लपून बसला होता. तिथल्या नाल्यात त्याने आपली लपण्याची जागा निवडली होती. पण भारतीय सैन्याने त्याला शोधले आणि जिवंत पकडले. लष्कर ए तय्यबाचा तो दहशतवादी असल्याचेही उघड झाले आहे. त्याच्याकडे एके ४७ रायफल आणि चीन-पाकिस्तानी बनावटीचे हॅण्डग्रेनेडही होते.
भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त वाढविली असून १८ सप्टेंबरपासून ही गस्त अधिक तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत भारतीय सैन्याने ६ दशहतवाद्यांचा खात्मा केला आहे.
हे ही वाचा:
ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळेंचे निधन
लसीकरणात भारताने गाठला ‘हा’ नवा टप्पा
जायकवाडी धरण दीर्घ कालावधीनंतर तृप्त; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची तहान भागणार!
पाकिस्तानातील हबीबुल्लाह खोऱ्यात त्याला दहशतवादी कारवायांचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. बाबरने हत्यारे पोहोचविण्याचे काम केले असले तरी त्याव्यतिरिक्त अन्य कामासाठीही त्याचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.