टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक

फ्रान्स पोलिसांनी केली कारवाई

टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक

टेलिग्राम मॅसेजिंग ऍपचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना अटक करण्यात आली आहे. फ्रान्समधील विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पॅरिसच्या जवळील बॉर्गेट विमानतळावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते स्वतःच्या खासगी जेटने पॅरिस येथे आले होते.

टेलिग्राम मॅसेजिंग ऍपचे संस्थापक पावेल डुरोव हे अजरबैजानमधून फ्रान्समध्ये पोहचले होते. त्यांच्या या अटकेवर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डुरोव हे दुबईत स्थायिक झाले आहेत. ते मुळचे रशियन आहेत. त्यांनी २०१४ मध्येच रशिया सोडला होता. फ्रान्स मीडियानुसार, डुरोव यांना टेलिग्राम ऍप संबंधी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कथितरित्या मनी लॉण्डरिंग, ड्रग्स तस्कारी आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला जात होता. या ऍपवर डुरोव यांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे यांच्याविरोधात फ्रान्स पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट जारी झाल्यापासून ते फ्रान्स आणि युरोपमध्ये जाणे टाळत होते.

हे ही वाचा:

“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”

आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

चिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

फोर्ब्सनुसार, डुरोव यांच्याकडे एकूण १५.५ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. सध्या टेलिग्रामवर जगभरात ९०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. या अटकेनंतर रशियातील ब्लॉगर्सने रविवार दुपारी फ्रान्सच्या दुतावासासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. फ्रान्स डुरोव यांच्यावर दडपण आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यापासून दोन्ही देशांमध्ये या ऍपचा वापर वाढला. राजकीय आणि सैन्य हालचालींसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील संवादाचे हे प्रभावी माध्यम आहे. आता त्यांना ऍपद्वारे होणारी गुन्हेगारी रोखण्यास अपयश आल्याने अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version