भारतीय बनावटीच्या तेजसचे रडार ‘उत्तम’

भारतीय बनावटीच्या तेजसचे रडार ‘उत्तम’

भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनांना बळ देण्यासाठी भारतीय बनावटीच्या तेजस विमानाला भारतीय बनावटीचेच रडार बसविण्यात येणार आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ऑर्डर देण्यात आलेल्या ८३ पैकी ६३ विमानांना ‘उत्तम’ हे स्वदेशी रडार बसवले जाणार आहे. या पूर्वी विमानांसाठी इस्रायली बनावटीचे रडार बसविण्यात येत असे.

हे ही वाचा:

आता खेळणीही भारतीय बनावटीची

‘डिफेन्स रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ)’ बंगळूरू स्थित एलआरडीई प्रयोगशाळेने विकसित केलेले रडार तेजसला बसविण्यात येईल. एचएएल उत्पादन करणाऱ्या तेजस एमके-१च्या २१व्या युनिटपासून हे रडार बसवण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल.

आपली ऑर्डर पूर्ण करण्याच्या दृष्टीने एचएएलने २० इस्रायली रडारची मागणी केली आहे. तोपर्यंत उत्तम हे स्वदेशी रडार विमानात बसविण्यासाठी तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष सतिश रेड्डी यांनी सांगितले की, उत्तम रडार २१व्या तेजस एमके-१एला बसविण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. आत्तापर्यंतच्या सर्व चाचण्यांत उत्तमची कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली राहिली आहे. आम्ही उत्तमच्या वापरासाठी एचएएल सोबत सामंजस्य करार केला आहे.

एचएएलने तेजसमधील भारतीय उपकरणांची टक्केवारी ५२ टक्क्यांपासून वाढवून ६०-६२ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘उत्तम’ रडार हे एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा भेद करण्यास सक्षम असलेले सर्वोच्च दर्जाचे रडार आहे, त्याशिवाय त्यामार्फत उच्च दर्जाचे फोटोग्राफ सुद्धा घेता येतात.

Exit mobile version