अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी तालिबान्यांनी घोर प्रांतात गर्भवती महिला पोलिसाला तिच्या कुटुंबासमोर गोळ्या घातल्या. घोर प्रांताची राजधानी फिरोजकोह इथली ही घटना आहे. तेव्हापासून, प्रांतात तालिबानविषयी अधिकच दहशत पसरली आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव बानो नेगर असं आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “हल्ला झाला तेव्हा ती ६ महिन्यांची गर्भवती होती. या हल्ल्यात तिचा संपूर्ण चेहरा खराब झाला होता”. त्याचवेळी, द सनच्या आणखी एका वृत्तानुसार, तालिबान्यांनी हल्ल्यादरम्यान तिची मुले आणि पतीसमोर तिची हत्या केली गेली. महिला पोलिसाचे रक्ताने भिजलेले फोटो देखील सोशल मीडियावर प्रसारित केले गेले. जिथे तिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या कार्पेटवर पडलेला होता. महिला पोलिसाच्या कुटुंबाने सांगितले की, “स्थानिक तालिबानने या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.”
यापूर्वी, हेरात प्रांतातील डझनभर महिलांनी सरकारमध्ये हक्क आणि महिलांच्या प्रतिनिधीत्वाच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. शनिवारी तालिबानने काबूलमध्ये महिलांच्या निदर्शनांवरही हल्ला केला. तालिबानच्या सत्तेतील मागील कार्यकाळ संपल्यानंतर लोकशाही राजवटीत निर्माण झालेल्या महिलांच्या नागरी हक्कांना सुरु ठेवण्याची मागणी आंदोलक करत होते.
आंदोलक राष्ट्रपती भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, असा दावा आंदोलकांनी केला आहे. “तर बंदुकीच्या मॅक्झिनने आमच्यावर निशाणा साधाल गेला, असं एका आंदोलनकर्त्याने न्यूज एजन्सी रॉयटर्सला सांगितलं.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेकला ईडीने बोलावून घेतले
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं
जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा
पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा
रविवारी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अफगाण महिलांनी आपले मस्तक आणि चेहरा झाकण्यास सुरुवात केली कारण त्यांना तालिबानी अतिरेक्यांनी हिजाब किंवा बुरख्याशिवाय पाहिलं तेव्हा त्यांना मारहाण झाली. गेल्या आठवड्यात तालिबानने खासगी विद्यापीठांना एक फर्मान जारी केले, ज्यामध्ये त्यांना पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांना एकत्र शिकवू नये असे आदेश देण्यात आले.