अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर तालिबान्यांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवले असले तरी, दुसरीकडे वस्तुस्थिती वेगळी दिसून येत आहे. तालिबान्यांनी आता हेलमंद प्रांतात दाढी कापण्यावर बंदी घातली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हेलमंद प्रांतातील सलूनवर तालिबान्यांनी क्लिन शेव किंवा स्टायलिश हेअरस्टाईल करण्यास बंदी घातली आहे. तालिबानच्या इस्लामिक ओरिएंटेशन मंत्रालयाने केशकर्तनकारांसोबत झालेल्या बैठकीनंतर हे आदेश दिले आहेत.
द फ्रंटिअर पोस्टच्या वृत्तानुसार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हेलमंद प्रांताची राजधानी लष्कर गाहमध्ये केशकर्तनकारांना स्टायलिश हेअरकट आणि दाढी कापण्यास बंदीचे आदेश दिले आहेत. हे आदेश सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आले आहेत. हेलमंद येथील सलूनबाहेर अशा प्रकारच्या आदेशांची पत्रक लावण्यात आली आहेत. या आदेशांमध्ये सलून मालक आणि कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत. शरिया कायद्याचे पालन करावे, असे पत्रकांमध्ये सांगितले आहे. तसेच त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले जात आहे की नाही हे पाहण्यासाठी तालिबानी प्रत्येक सलूनची झडती घेत आहेत आणि मालकांना धमकावत आहेत.
हे ही वाचा:
लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?
युद्धात पाकिस्तानवर शौर्य गाजवणारा ‘वैजयंता’ सापडला रेतीबंदरच्या कचऱ्यात
१५० सीसीटीव्ही बघून तीन चोरांचा काढला माग
अडसूळ अडचणीत; ईडीच्या छापेमारीनंतर रुग्णालयात धाव
केस कापतानाही साध्या पद्धतीने कापावे, विदेशी पद्धतीच्या हेअरस्टाईल्सवर बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील अनेक ब्युटीपार्लर्स बाहेरील मुलींचे फोटो तालिबान्यांनी फाडले आहेत. ब्युटी पार्लरही बंद पडले आहेत. सत्तापालटानंतर तालिबान्यांनी महिलांना सर्व अधिकार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही वचनांची पूर्ती त्यांनी केलेली नाही. महिलांना शिक्षण घेण्यासाठीही अनेक निर्बंध तालिबान्यांनी लादले आहेत. महिलांना कामावर येण्यास बंदी घातली आहे. तालिबानने १९९६ ते २००१ दरम्यान आपल्या राजवटीत असेच नियम लागू केले होते.