राणाची इच्छा होती, २६/११ च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा!

तहव्वूर राणा आणि हेडली यांच्यातील संवाद झाला उघड

राणाची इच्छा होती, २६/११ च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा!

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याला वाटत होते की हा हल्ला करणाऱ्या ‘लश्कर-ए-तैयबा’च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्यात यावा. अमेरिकेच्या न्याय विभागाने या संदर्भात निवेदन जारी केले असून, राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्यातील काही संवादाचे अंशही सार्वजनिक केले आहेत.

तहव्वुर राणा हा अमेरिकन नागरिक असलेल्या २००८च्या मुंबई हल्ल्याच्या प्रमुख कट रचणाऱ्यांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी आहे.

निवेदनात म्हटले आहे, “हल्ल्यानंतर राणाने हेडलीला म्हणाला होता की ‘भारतीय यासाठी पात्र होते’. हेडलीसोबतच्या एका इंटरसेप्ट केलेल्या संभाषणात राणाने हल्ल्यात ठार झालेल्या नऊ ‘लश्कर’ दहशतवाद्यांचे कौतुक करताना सांगितले की त्यांना ‘निशान-ए-हैदर’ सन्मान दिला जावा.”

हे ही वाचा:

दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि २०११ चे मोदींचे ट्वीट व्हायरल; काय आहे प्रकरण?

‘पंजाबचा टॉयलेट किंग’, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह नेते होतायेत ट्रोल!

हा तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील महाघोटाळा?

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला अटक

‘निशान-ए-हैदर’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार आहे, जो केवळ सैन्यातील सदस्यांनाच दिला जातो. हवा, जमीन किंवा समुद्रात शत्रूचा सामना करताना दाखवलेल्या असामान्य शौर्याच्या कृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून आतापर्यंत फक्त ११ वेळा हा सन्मान दिला गेला आहे.

“संयुक्त राज्य अमेरिका सरकारने ९ एप्रिल रोजी घोषित केले की कनाडाचा नागरिक आणि पाकिस्तानचा मूळ रहिवासी तहव्वुर हुसैन राणा याला २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या कथित भूमिकेबाबत भारतात १० गुन्हेगारी आरोपांवर खटला चालवण्यासाठी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. हा प्रत्यार्पण निर्णय त्या हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या सहा अमेरिकन नागरिकांसह अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”

निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, “राणा याच्यावरील ही कार्यवाही अशी पहिली वेळ नाही जिथे त्याच्यावर हिंसक दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होण्याचा आरोप ठेवण्यात आला. २०१३ मध्ये, त्याला लष्कर-ए-तैयबा या संघटनेला सहाय्य करण्याच्या आरोपाखाली १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तसेच डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे ‘लष्कर’च्या एका हल्ल्याच्या कटात सामील असल्याबद्दलही शिक्षा झाली होती. त्याच खटल्यात, हेडलीला १२ संघीय दहशतवादाच्या आरोपांत दोषी ठरवण्यात आले आणि त्याला ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.”

प्रदीर्घ लढाईनंतर राणाला भारतात हस्तांतरित करण्यात आले. गुरुवारी राणाला अमेरिकेतून दिल्ली येथे आणण्यात आले, जिथे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आणि कोर्टाने त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले केले होते. या भयंकर हल्ल्यात १६४ लोकांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक जखमी झाले. हल्लेखोरांनी भारतीय आणि परदेशी नागरिकांची निर्दयतेने हत्या केली होती. सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले, तर एक अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता. त्याला नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.

Exit mobile version