रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली, की उत्तराखंडमध्ये रेल्वे आणि रोपवेचे जाळे पसरविण्यासाठी शक्यता चाचपडून पाहणार आहे. उत्तराखंडमधील हा विकास स्वित्झरलँडच्या धर्तीवर केला जाणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांना हे आश्वासन देण्यात आले होते.
रेल्वे मंत्र्यांनी सर्व्हेसाठी तनकपूर- बाघेश्वर मार्गिकेचा विचार केला आहे. याबरोबरच त्यांनी हरिद्वार- रैवाला मार्गिकेचे तातडीने दुहेरीकरणाच्या कामासोबतच देहरादून आणि ऋषिकेश दरम्यान थेट रेल्वेसेवा चालू करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
मोदी सरकारने डोंगराळ प्रदेश असलेल्या सीमावर्ती भागातील या राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे या भागातल्या पर्यटनाला चालना तर मिळेलच, परंतु अनेक सुविधाही प्राप्त होतील.
मोदी सरकारने चारधाम महामार्ग विकास परियोजनेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील हाती घेतला आहे. सुमारे ९०० किमी लांबीचा हा महामार्ग केदारनाथ, बद्रिनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चार स्थळांव्यतिरिक्त तनकपूर शहराला देखील जोडणार आहे. एकूण प्रकल्पाची अंदाजीत किंमत ₹१२,००० कोटी असणार आहे.
त्याशिवाय केंद्र सरकार दिल्ली आणि टेहरी दरम्यान सीप्लेन सेवा चालू करण्याच्या प्रयत्नात आहे.