युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचं मुख्य कारण आहे ते म्हणजे नाटो. North Atlantic Treaty Organisation (NATO) या लष्करी संघटनेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे आता युरोपमधील स्वीडन आणि फिनलँड या देशांवर चिडले आहेत.
नाटो काय आहे?
सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे तो नाटो या लष्करी संघटनेमुळे. ही लष्करी संघटना युक्रेनच्या माध्यमातून आपल्या सीमेपर्यंत पोहचू नये म्हणूनच रशियाने आक्रमक भूमिका घेत युक्रेनवर हल्ला केला. शीतयुद्धाच्या काळात १९४९ मध्ये सोव्हिएत संघाचा म्हणजेच USSRचा सामना करण्यासाठी म्हणून १२ देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. आता या संघटनेत ३० देश सदस्य आहेत. त्यानंतर युरोपमधले फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश नाटोचे सदस्य होण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत.
फिनलँड, स्वीडन, युक्रेन आणि रशियाची भौगोलिक परिस्थिती
जगातले हे युद्ध ज्या संघटनेमुळे सुरू आहे त्याच संघटनेत आता या दोन देशांना जाण्याची इच्छा आहे. युक्रेन आणि फिनलँड या दोन देशांचा विचार केला तर या दोन्ही देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. स्वीडनची सीमा जरी रशियाला लागून नसली तरीही त्याची सीमा फिनलँडला लागून आहे. म्हणजेच नाटोचे हे दोन देश सदस्य झाले तर ही नाटो संघटना पुन्हा एकदा रशियाच्या सीमेवर येऊन पोहचणार आहे. युक्रेनचा विचार केला तर युक्रेन हा रशियाच्या पश्चिम सीमेवर आहे. तर युक्रेनची दुसरी सीमा ही युरोपियन युनियनला लागून आहे.
रशियावर दुसऱ्या महायुद्धात पश्चिमेकडून जेव्हा हल्ला झाला होता, त्यावेळी युक्रेनच्याच परिसरातून रशियाने स्वतःचं संरक्षण केलं होतं. शिवाय युक्रेनच्या सीमेपासून रशियाची राजधानी मॉस्को ही १ हजार मैल म्हणजेच १ हजार ६०० किलोमीटर इतक्याच अंतरावर आहे. जर यूक्रेन नाटोबरोबर गेल तर रशियाचे राजधानीचे शहर मॉस्को हे केवळ ४०० मैल म्हणजेच ६४० किलोमीटर अंतरावर येईल आणि म्हणूनच रशियाला युक्रेन नाटोचा सदस्य व्हायला नको आहे. शिवाय युक्रेन हा नाटोचा सदस्य बनणार नाही अशी हमी रशियाला हवी होती.
युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाहीये. पण तो ‘भागीदार देश’ आहे म्हणजेच भविष्यात युक्रेनला नाटोचा सदस्य होता येऊ शकतं आणि याचीच भीती रशियाला होती. त्यामुळे रशियाने युक्रेन ऐकत नाही म्हटल्यावर युक्रेनवर आक्रमण केल. आता ५० दिवसांहून अधिक दिवस झाले हे युद्ध सुरूच आहे. युक्रेनचे नागरिक देश सोडून जातायत. त्याच वेळी जागतिक बाजारपेठेवर या युद्धाचा परिणाम दिसून येतोय. या दोन देशांमधून एक्पोर्ट होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध आल्यामुळे किंमती वाढल्यात. जगभरात तेल, गहू, वायूच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झालीये. अशा स्थितीत आता फिनलँड आणि स्वीडनने नाटो सदस्यत्व स्वीकारण्याबाबत पुढील पावले उचलली तर रशियाने युक्रेनवर आक्रमण करून परिस्थिती चिघळली आहे ती आणखी चिघळेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही हे दोन देश नाटोमध्ये गेले तर त्याचे परिणाम युक्रेनसारखे भयानक होतील असा इशाराच दिलाय.
फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश रशियाच्या जवळ आहेत. फिनलँडची १ हजार ३०० किलोमीटर म्हणजेच ८१० मैल लांबीची सीमा रशियाला लागून आहे. फिनलँड गेल्या काही दशकांपासून तटस्थ राहिलाय. मात्र, रशियाने यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर फिनलँडला भीती वाटायला लागलीये की, यूक्रेनसारखी आपली स्थिती होऊ शकते. त्यामुळे फिनलँडसरकारसोबत तिथली जनतासुद्धा नाटोमध्ये जाण्याच्या बाजूने आहे. फिनलँडच्या पंतप्रधान साना मारिया यांनी नाटोमध्ये जर आम्हाला जायचं असेल तर त्या निर्णयाचं सतर्कपणे आणि योग्य विश्लेषण करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. नाटोमध्ये गेल्यामुळे सुरक्षा मिळेल असं फिनलँडचं म्हणणय. स्वीडनही नाटोमध्ये जाण्यास उत्सुक असल्याने पुतीन यांनी स्वीडनलाही इशारा दिलाय.
रशिया फिनलँडविरोधात आक्रमक झालाय कारण फिनलँडपासून जवळचं रशियाच्या आर्थिक राजधानीचं शहर सेंट पीटर्सबर्ग आहे. जर दोन्ही देशात युद्ध झालं तर फिनलँड त्या शहरावर हल्ला करु शकतं. जसं युक्रेनपासून राजधानीचे शहर जवळ आहे तसंच रशियाचं महत्त्वाचं शहर फिनलँडपासून जवळ आहे. या शहरात रशियातील अब्जाधीश लोक राहायला आहेत. दुसरीकडे अमेरिकेनं फिनलँडला एफ-३५ फायटर जेट दिलेलं आहे. हे जेट रडारवर देखील दिसत नाही. त्यामुळे रशियाने फिनलँडला वेळीच इशारा दिलाय.
हे ही वाचा:
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!
दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!
दुसरीकडे नाटोचा विचार केला तर स्वीडन आणि फिनलँड हे नाटोसाठी नक्कीच फायदेशीर आहेत. त्या दोन्ही देशांची एकजूट आहे. तसंच दोन्ही देशांची नाटोसोबत काम करण्याची तयारी आहे. फिनलँडकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आहेत. दोन्ही देश नाटोत सहभागी झाले तर त्याचा उत्तर यूरोप आणि बाल्टिक समुद्रातील संरक्षण वाढवण्यासाठी फायदा होणारे. त्यामुळेच रशिया फिनलँड आणि स्वीडनच्या या चालीमुळे चिडलाय आणि त्यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि मिसाईल फिनलँडच्या सीमेवर तैनात केलीत. त्यामुळे आता फिनलँड आणि स्वीडन हे नाटोमध्ये जाणार की नाही? नाटोमध्ये गेले तर रशिया काय करणार? नव्या संघर्षाला तोंड फुटणार का? आणि त्याचे परिणाम जगावर काय होणार? याकडे आता जागाचं लक्ष असणार आहे.