सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?

सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?

सांगली जिल्ह्यातील सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांची लोखंडी खुर्ची सध्या सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे. बाळू यांची लोखंडी खुर्ची सातासमुद्रापार असलेल्या लंडनच्या मँचेस्टर शहरात पाहायला मिळाली आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी बाळू यांच्या खुर्चीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्यावर काही क्षणातच तो व्हायरल झाला.

लंडनमधील मँचेस्टरच्या अल्ट्रीक्म भागात फिरत असताना एका हॉटेलच्या परिसरात लेले यांना लोखंडी खुर्ची दिसली. लेले यांनी त्याच लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करताच तो लगेच व्हायरल झाला. या वीस सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये जुन्या काळातील फोल्डिंगची लोखंडी खुर्ची दिसते आहे आणि या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे सावळज’ असे लिहिलेले आहे. सोबतच चर्चा घडू लागली ती म्हणजे बाळू यांची खुर्ची इतक्या लांब पोहचली कशी याची.

बाळू लोखंडे यांनी १५ वर्षांपूर्वी स्वतःचा मंडप व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा त्यांनी कर्नाटक मधील हुबळी येथून प्रत्येकी १३ किलो वजनाच्या दणकट खुर्च्या आणल्या. त्यानंतर या खुर्च्या हाताळायला कठीण असल्याने त्यांनी त्या भंगारात विकून टाकल्या. पुढे या खुर्च्या मुंबईत पोहचल्या आणि तिथून एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून विकत घेतल्या. मजबूत लोखंड पाहून मँचेस्टरच्या हॉटेल मालकाने विकत घेतल्या आणि आता ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.

हे ही वाचा:

आरे कारशेडच्या विरोधामुळे मेट्रो चार वर्षे ताटकळणार!

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत बोरिवलीचे १० खेळाडू

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

आजही बाळू यांच्याकडे काही जुन्या लोखंडी खुर्च्या आहेत. बाळू लोखंडे यांच्या खुर्चीचा शोध घेत सुनंदन लेले यांनी लंडन मधून सावळज मध्ये बाळू लोखंडे यांच्याशी फोन वरून माहितीही घेतली.

Exit mobile version