यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकालात जास्तीत जास्त विद्यार्थी हे प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या प्रवेश यादीतून प्रवेशप्रक्रियेची असणारी स्पर्धा समोर आली आहे. वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगली श्रेणी मिळूनही नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि चांगल्या श्रेणीने पास होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नामवंत महाविद्यालयातील उपलब्ध जागांच्या शंभर पटीने अर्ज येत आहेत. महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुणही यंदा चार ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये तेथेच बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यामुळे पहिल्या यादीसाठीही खूपच कमी जागा शिल्लक आहेत.
हे ही वाचा:
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
सुडोकूचा निर्माता माकी काजी याचे निधन
अलिगढ, मैनपुरी आणि फिरोजाबादच्या नामांतराचा प्रस्ताव
पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत अटीतटीची स्पर्धा वाढली आहे. साधारण एक किंवा दोन तुकड्यांची प्रवेश क्षमता असणाऱ्या महाविद्यालयामध्ये म्हणजेच ६० ते १२० प्रवेश क्षमता असताना त्या जागांसाठी ४ ते ६ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत. नामवंत महाविद्यालयात आलेल्या बहुतांश अर्जदार विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. स्वायत्त महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. यंदाही या महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. वाढलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या महाविद्यालयांना तुकडी वाढवण्याची मुभा दिली आहे.
मिठीबाई महाविद्यालयात बीएमएम अभ्यासक्रमासाठी ६ हजार ७०० विद्यार्थी, जय हिंद महाविद्यालयात बीएमएस अभ्यासक्रमासाठी ५ हजार ५१३ विद्यार्थी, झेविअर्सच्या बीए अभ्यासक्रमासाठी ४ हजार १०९ विद्यार्थी, बीएमएस अभ्यासक्रमासाठी ३ हजार ८६६ विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यातील केवळ ६० ते १०० विद्यार्थ्यांनाच या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया १८ ते २५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.