विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आता सेतूचा ताण

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आता सेतूचा ताण

मागील वर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा प्रत्यक्ष न भरता ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू होते. प्रत्यक्ष शाळा न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रम लागू केला आहे. सेतू अभ्यासक्रमातील कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी घरून सोडवून आणायच्या सूचना शाळांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास यात अजून सेतू अभ्यासक्रमाची भर पडली आहे.

मागील इयत्तेतील क्षमता संपादित न होताच विद्यार्थी पुढील वर्गात आले, अशी शक्यता गृहीत धरून ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ने इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावीसाठी सेतू अभ्यासक्रम तयार केला. १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमातील सर्व विषयांच्या कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी लेखी सोडवणे अपेक्षित आहे. रोजचे ऑनलाईन वर्ग, अभ्यास तसेच इतर कालांसाठीचे ऑनलाईन वर्ग यात अजून सेतू अभ्यासक्रमाची भर पडल्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण पडत आहे.

हे ही वाचा:

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

गेल्या वर्षीच्या काही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्या नसतील तर त्यांची उजळणी या सेतू अभ्यासक्रमातून होईल आणि त्याचे गुण मूल्यमापनात कुठे गृहीत धरले जाणार आहेत याचा विचार पालकांनी आणि शिक्षकांनी करू नये. हा अभ्यासक्रम करून घेण्याची प्राथमिक जबाबदारी शाळांची आहे असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले.

प्राथमिक वर्गांना गेल्या वर्षी इतका लिखाणाचा भार नव्हता आणि आता अचानक इतका भार विद्यार्थ्यांना टाकणे योग्य नाही. हा अभ्यासक्रम उन्हाळी सुट्टीच्या शेवटी द्यायला हवा होता किंवा आता वर्ष सुरू झाल्यावर तोंडी घायला हवा होता असे पालक स्वाती दामले यांनी सांगितले.

प्रत्यक्ष शाळा सुरू असताना एकाच दिवशी सर्व विषयांचा अभ्यास दिला जात नाही. शिवाय दरदिवशी सर्व विषयांसाठीच्या कृतिपत्रिका सोडवून घेण्यासाठी ऑनलाईन वर्ग आयोजित करण्याचे शक्य नाही असे मत पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी सांगितले. दरदिवशीच्या कृतिपत्रिकांची संख्या कमी करावी आणि जास्तीत जास्त उजळणी तोंडी घ्यावी असे पत्र संघटनेने शिक्षण विभागाला लिहिले होते.

Exit mobile version