जेव्हा विद्यार्थ्यांच्या राजकारणाची चर्चा केली जाते, तेव्हा जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र पंजाबमधील विद्यार्थ्यांच्या राजकारणाने दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याची परिस्थिती उद्भवली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले आहेत. त्याचवेळी कॅनडामधील विनिपेगमध्ये काही जणांनी गँगस्टर आणि खलिस्तानी दहशतवादी सुखा दुनेके याच्या फ्लॅटमध्ये घुसून त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. दुनेकेच्या हत्येनंतर लगेचच भारतातील तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दुनेकेची हत्या करून गुरलाल ब्रारच्या हत्येचा बदला घेतल्याचे बिश्नोईने म्हटले आहे.
गुरलाल ब्रार हा कॅनडातीलच गोल्डी ब्रार याचा छोटा भाऊ होता. त्याची हत्या करण्यात आली होती. गुरलाल हा स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी (एसओपीयू)चा राज्याचा अध्यक्ष होता. लॉरेन्स बिश्नोई आणि दविंदर बांबिहा यांच्यातील टोळीयुद्धामुळे सन २०२०मध्ये पंजाब, हरियाणा, चंडीगढ आणि दिल्ली एनसीआरमध्ये अनेक हत्या झाल्या आहेत.
जेव्हा बिश्नोईचा उमेदवार पंजाब युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत पराभूत झाला, तेव्हा दोन्ही गटांमध्ये शत्रुत्व वाढले. त्यानंतर टोळीयुद्धाला सुरुवात झाली. भारतात जेव्हा त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या, तेव्हा दोघांनाही कॅनडात पलायन केले. कॅनडा हे खलिस्तानी दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण झाले आहे. कॅनडात बसून हे दहशतवादी भारतात हत्या करू लागले. या टोळ्या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि एनसीआरमध्ये सक्रिय आहेत.
पंजाबमधील शत्रुत्व आणि हत्यांच्या सत्राने आता कॅनडामध्येही टोळीयुद्धाचे रूप घेतले आहे. हत्येमधील सहभागी आणि मरणाऱ्यांचा संबंध बिश्नोई किंवा बांबीहा टोळीशी असतो. लॉरेन्स बिश्नोई याने सन २०१०मध्ये डीएव्ही कॉलेजमधून विद्यार्थी राजकारणात पाऊल टाकले होते. सन २०११मध्ये अकाली नेते विक्रमजीत सिंग उर्फ विकी मिदूखेडा यांच्या उपस्थितीत बिश्नोई याची कॉलेजचा विद्यार्थी प्रमुख म्हणून निवड केली होती.
हे ही वाचा:
… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन
एअर इंडियाच्या फ्लाईट अटेंडन्ट आता साडीत दिसणार नाहीत!
वहिदा रहमान यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी
ट्रुडो यांच्या भारतावरील आरोपांवरून श्रीलंकेचा संताप!
गेल्या सहा वर्षांत बिश्नोईच्या विरुद्ध ३६ गुन्हे दाखल आहेत. बिश्नोईचा जेव्हा गुरलाल ब्रारशी संबंध आला, तेव्हा त्याने ब्रारला पाठिंबा दिला. सन २०१६मध्ये ब्रार हा एसओपीयूचा प्रमुख झाला. बिश्नोईचा हा विजय बांबिहा टोळीला सहन होत नव्हता. अशा परिस्थितीत दोन्ही टोळ्यांमधील शत्रुत्व वाढतच गेले. सन २०१७मध्ये बांबिहा गँगच्या गुर्गे लवी देओराची बिश्नोई गँगने हत्या केली. त्यानंतर तीन वर्षांनंतर चंदीगढमध्ये एका नाइटक्लबच्या बाहेर गुरलाल ब्रारची हत्या झाली. त्यानंतर बांबिहा गँगने बिश्नोईचा निकटचा सहकारी विकी मिदुखेरा याची हत्या केली. ब्रारच्या हत्येला तीन वर्षे झाली आहेत आणि आता बिश्नोई गँगतर्फे असे सांगितले जातेय की, सुक्खाची हत्या करून ब्रारचा हत्येचा बदला घेण्यात आला आहे.