अयोध्येत पुढील वर्षी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत राम मंदिराच्या इतिहासाशी संबंधित पाच भागांच्या एक वेबिनार सीरीजचे आयोजन केले जाणार आहे.
‘अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी हिंदूंचा ५०० वर्षे संघर्ष’ अशी या वेबिनार सीरीजची संकल्पना आहे. विश्व हिंदू परिषदेची अमेरिकेतील शाखा आणि हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, ९ डिसेंबरला भारतीय पुरातत्त्व विभागाचे विभागीय संचालक केके मुहम्मद यांचे सादरीकरण होईल.
महत्त्वाची स्मारके शोधण्यात आणि त्यांचे जतन करण्यात मोहम्मद यांचे मोठे योगदान आहे. यासाठी त्यांना सन २०१८मध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर रोजी, भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी राम मंदिर निर्माणाच्या ऐतिहासिक महत्त्वावर बोलतील. तसेच, ज्ञानवापी मशिद वादाशी संबंधित वकील विष्णु शंकर जैन ६ जानेवारीला होणाऱ्या होणाऱ्या वेबिनारचे मुख्य वक्ते असतील.
हे ही वाचा:
आदित्य एल-१ने काढली सूर्याची पहिलीवहिली छायाचित्रे
नरेंद्र मोदी जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते
कोणताही प्रशिक्षक शमीसारखा गोलंदाज तयार करू शकत नाही!
तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!
या दरम्यान ते राम मंदिर आंदोलनाच्या कायदेशीर बाजूवर प्रकाश टाकतील. वेबिनारच्या चौथ्या दिवशी, ७ जानेवारीला वैज्ञानिक आणि लेखक आनंद रंगनाथन ५०० वर्षांपासूनचा हिंदूंचा संघर्ष आणि अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण यावर बोलतील.
वेबिनारच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी १३ जानेवारी रोजी राम मंदिर पुनर्निर्माणसाठी हिंदू अमेरिकी नागरिकांच्या योगदानावर लक्ष केंद्रित केले जाईल. या वेबिनारच्या माध्यमातून हिंदूंच्या संघर्षाच्या दीर्घ इतिहासावर प्रकाश टाकला जाईल, असे हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका आणि अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेच्या शाखेने जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केले आहे.