तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे गुरुवारी सायंकाळपर्यंत ‘मांडूस’ नावाच्या चक्रीवादळात रूपांतरित होईल. या वादळाचा फटका उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर होईल. येत्या ४८ तासांत हे चक्रीवादळ भयंकर रूप धारण करू शकते. त्यामुळे तामिळनाडूच्या उत्तर किनारी जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्याचबरोबर वादळाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सहा जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
राज्य सरकारने चक्रीवादळ-प्रवण जिल्ह्यांमध्ये ५,००० पेक्षा जास्त मदत शिबिरे सखल भागांतून स्थलांतरित केलेल्या लोकांसाठी सुरु करण्यात आलेली आहेत. शिबिरात राहणाऱ्या लोकांना अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य यासह सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पावसाच्या परिणामावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्षही उघडण्यात आला आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूसह पद्दुचेरीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.