जगातील सगळ्यात मोठा पुतळा असणाऱ्या ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ ला संपूर्ण भारताशी जोडण्यासाठी ८ नव्या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ होणार आहे. ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ असलेल्या केवडिया गावी जाणाऱ्या नव्या गाड्यांना आज १७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नव्या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून केवडियाची उर्वरित भारताशी जोडणी सुलभ होणार आहे.
One of the trains being flagged-off tomorrow is the Jan Shatabdi Express between Ahmedabad and Kevadia. This train will have Vistadome coaches.
Sharing some glimpses. pic.twitter.com/ihsZoxOo8S
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2021
२०१८ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केवडिया स्थानकाचे भूमीपूजन केले होते ज्याचे बांधकाम आता पूर्ण झाले असून या स्थानकाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणपत्र असलेले भारतातील पहिले स्थानक आहे. पंतप्रधान मोदी इतरही काही रेल्वे विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. यात दाभोई – चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड – केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर – केवडिया विभाग आणि दाभोई, चांदोड या नवीन स्थानकांचा समावेश आहे.
केवडियाला जाणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या पुढीलप्रमाणे असणार आहेत. केवडिया-वाराणसी महामन्ना एक्सेप्रेस, दादर केवडिया एक्सप्रेस, अहमदाबाद-केवडिया जनशताब्दी एक्सप्रेस, निझामुद्दीन-केवडिया संपर्क क्रांती एक्सप्रेस, केवडिया-रेवा एक्सप्रेस, चेन्नई-केवडिया एक्सप्रेस, केवडिया-प्रतापनगर आणि प्रतापनगर-केवडिया मेमू ट्रेन या गाड्यांचा समावेश आहे.
या नव्या प्रकल्पांद्वारे केवडिया नजीकच्या आदिवासी भागातील विकास कार्यात भर पडणार असून नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या महत्त्वाच्या धार्मिक आणि पुरातन तीर्थस्थळांना जोडण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटन दोन्ही वाढून प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. यामुळे नवीन रोजगार आणि व्यवसाय संधीही निर्माण करण्यात मदत होईल असेही सरकारचे म्हणणे आहे.