एसटी कर्मचाऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
सध्या महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाची अवस्था बिकट झाली आहे. उत्पन्न नाही आणि खर्च मात्र प्रचंड अशा परिस्थितीत कर्जाचा डोंगर वाढतो आहे. या परिस्थितीमुळे पिचलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांना दारिद्र्यरेषेखाली सामावून घ्या, असे आवाहन केले आहे.
गणेश खटके या शिरूर आगारातील एका वाहकाने (एसटी कंडक्टर) हे पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे हे महामंडळ आहे असे म्हटले जाते पण महामंडळात खासगी कंत्राटदारीने उच्छाद मांडला आहे. एसटी तोट्यात आहे याचे खापर कर्मचाऱ्यांवर कसे काय मारले जाते? एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग का लागू झालेला नाही. तो द्यायचा नसेल तर नका देऊ पण आमची उपासमार तरी थांबवा. त्यासाठी आम्हाला दारिद्र्यरेषेखाली समाविष्ट करा. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, वृद्ध आईवडिलांच्या आरोग्याचा खर्च राज्य सरकारने उचलावा. दारिद्र्यरेषेखाली आमचा समावेश केला तर आमच्यासाठी तो सुवर्णदिन असेल.
खटके यांनी प्रश्न विचारला आहे की, १५ हजार रुपयांत ९ माणसांचे कुटुंब कसे चालेल? त्यांनी आपला खर्चच पत्रात नमूद केला आहे.
घरभाडे ४५००, किराणा ४०००, महिन्याचा गॅस १६००, दूध भाजीपाला २५००, आरोग्याचा किरकोळ खर्च ४ ते ५ हजार रु. तीन मुलांच्या शाळेचा खर्च १५००, कपडे, चप्पल अशा खर्चासाठी ३ ते ४ हजार रु. पेट्रोल गाडी खर्च २ हजार रु. बँक व इतर कर्जाचे हप्ते ५ हजार.
हे ही वाचा:
ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र
भोंदू बाबाचा वेष घेत महिलेवर बलात्कार! मुख्य आरोपी यासिन शेख अटकेत
स्त्रियांनाही मिळणार सैन्यात जाण्याची संधी
वांद्रे शासकीय वसाहत पुनर्विकासाला आला वेग
खटके म्हणतात की, तोट्याचे कारण देत आतापर्यंत महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर नोकरवर्गाप्रमाणे वेतनही मिळत नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्यपालांकडे दिले आहे. आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा अशी आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे.
वेतन सांगायची, पण लाज वाटते!
खटके यांनी ‘न्यूज डंका’शी संवाद साधताना म्हटले की, आमचा हवातसा वापर करून घेतला जातो. आम्ही अडल्यानडल्या वेळी कामावर जातो पण आमच्या वेतनात काही सुधारणा होत नाही. आम्हाला आमचे वेतन दुसऱ्या कुणाला सांगताना लाज वाटते. कधी कधी तर आम्ही पाचएक हजार रु. वाढवून सांगतो. आमच्यासोबत एसटीत असलेले कर्मचारी भरपूर पगार घेतात, पण आम्हाला तेवढे वेतनही मिळत नाही. माझी १० वर्षे एसटीत सेवा झाली पण हातात १५ हजार रुपयेच येतात. आम्ही काय करायचे?