ईश्वरनिंदेच्या आरोपावरून एका श्रीलंकन नागरिकाला ठार मारून नंतर त्याचा मृतदेह पेटवून दिल्याची घटना पाकिस्तानातील सियालकोट येथे घडली. ही घटना घडल्यावर तेथील पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले खरे पण या घटनेमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानातील धार्मिक असहिष्णुतेचे दर्शन घडले आहे.
‘डॉन’ या तेथील वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार सियालकोटमधील वझिराबाद रोड येथे ही घटना घडली. खासगी फॅक्टरीतील कामगारांनी एका एक्स्पोर्ट मॅनेजरला ठार मारले आणि त्याचा मृतदेह जाळला. प्रियंथा कुमारा असे या व्यक्तीचे नाव असून ४०वर्षांच्या कुमाराने तेहरिक ए लब्बैक या कट्टरतावादी संघटनेचे पोस्टर फाडले आणि कचरापेटीत टाकून दिले. त्या पोस्टरवर कुराणातील काही ओळी लिहिल्या होत्या. काही कामगारांनी त्याला तसे करताना पाहिले आणि ती बातमी फॅक्टरीत पसरली. त्यानंतर कुमारा यांची हत्या करण्यात आली आणि शेकडो लोक काही घोषणा देत होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध करून गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाईल, असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा
परमबीर सिंग यांनी निलंबनाचा आदेश स्वीकारला
लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर; राहुल गांधींचा कोणता क्रमांक?
सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बझदर यांनी ही घटना भयंकर असल्याचे म्हटले आहे तर सियालकोट पोलिसांनी या घटनेची माहिती घेऊन ती प्रसारमाध्यमांना दिली आहे. या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सियालकोटमध्ये याआधी २०१०मध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच दोन युवकांना दरोडेखोर समजून ठार मारण्यात आले होते.