आशिया कपवर श्रीलंकेने कोरले नाव

सहाव्यांदा जिंकली स्पर्धा

आशिया कपवर श्रीलंकेने कोरले नाव

आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सुपर फोरमध्ये याच श्रीलंकेने पाकिस्तानवर मात केली होती. त्याचीच पुनरावृत्ती अंतिम सामन्यातही त्यांनी करून दाखविली. श्रीलंकेने केलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला १४७ धावापर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेचा हा आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाकिस्तानवरचा तिसरा विजय आहे. याआधी पाकिस्तानवर श्रीलंकेने दोन अंतिम सामन्यात ५ विकेट्सनी विजय मिळविला होता.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७० धावा केल्या. त्यात भानुका राजपक्षा याच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याशिवाय वानिंदु डीसिल्व्हाने ३६ धावांची खेळी केली.

श्रीलंकेची अवस्था ९व्या षटकात ५ बाद ५८ अशी असताना पाकिस्तानला विजयाचे स्वप्न पडले. पण ७व्या विकेटसाठी राजपक्षा आणि चामिका करुणारत्ने यांनी ५४ धावांची भागीदारी करत १७० धावसंख्येपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या हारिस रौफ याने २९ धावांत ३ बळी घेतले.

हे ही वाचा:

प्रवासी वाहनांच्या विक्रीला मिळाली भरघोस गती

राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांनी सांगितला पेशव्यांचा पराक्रम

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे ९९ व्या वर्षी निधन

 

पाकिस्तानला ही धावसंख्या जड गेली. सलामीवीर मोहम्मद रिझवानची ५५ धावांची तर इफ्तिकार अहमदची ३२ धावांची खेळी वगळता पाकिस्तानी फलंदाजांनी हाराकिरी केली. श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज प्रमोद लियानागमागे याने ३४ धावांत ४ तर वानिंदु डीसिल्व्हा याने २७ धावांत ३ बळी घेत पाकिस्तानला खिंडार पाडले.

श्रीलंकेने ही स्पर्धा सहाव्यांदा जिंकली आहे. याआधी त्यांनी भारतालाही तीनवेळा आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केले आहे. संयुक्त अरब अमिरातीत दोनवेळा त्यांना भारताकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ही पहिलीच वेळ होती की त्यांनी यूएईमध्ये प्रथमच आशिया कप जिंकला.

 

स्कोअरबोर्ड

श्रीलंका ६ बाद १७० (भानुका राजपक्षा ७१, वानिंदु डीसिल्व्हा ३६, धनंजय डीसिल्व्हा २८, हारिस रौफ २९-३) विजयी वि. पाकिस्तान (मोहम्मद रिझवान ५५, इफ्तिकार अहमद ३२, हारिस रौफ १३, प्रमोद डीसिल्व्हा ३४-४, वानिंदु डीसिल्व्हा २७-३, चामिका करुणारत्ने ३३-२)

सामनावीर : भानुका राजपक्षा

मालिकावीर : वानिंदु डीसिल्व्हा

 

Exit mobile version