गेल्या वर्षभरापासून देशात कोविड-१९ने थैमान मांडले होते. फेब्रुवारी महिन्यापासूनच देशासमोरची चिंता हळूहळू वाढत असताच अचानक या चिंतेने अक्राळविक्राळ रुप धारण केले आणि पाहता पाहता देशाला कोविड-१९ महामारीचा जबरदस्त तडाखा बसला. मात्र गेल्या काही काळापासून कोविड-१९च्या प्रत्यक्ष रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे.
दिनांक १६ जानेवारीपासून भारतीय बनावटीची कोविशिल्ड ही लस बाजारात येऊन, मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरूवात देखील झाली आहे. लसीकरण मोहिमेमुळे नव्या रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. इतकेच नाही, तर भारताने आपल्या लसीच्या आधारे इतर देशांना देखील या महामारीतून तारून न्यायला सुरूवात केली आहे. आज घडीला लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत तीन वेळेला सुमारे पाच लाख लोकांना ही लस दिली आहे. त्यामुळे भारत एकूण ५० लाख लस देणारा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. याबद्दल प्रसिद्ध वार्ताहर आनंद नरसिम्हन यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी असेही म्हटले आहे की गेल्या चोविस तासात केवळ ८० मृत्यू झाले आणि ही गेल्या ९ महिन्यांतली सर्वात कमी आकडेवारी आहे. त्याशिवाय १७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाही. ट्वीटच्या शेवटी त्यांनी ‘जय भारत’ असेही म्हटले आहे.
We are now the 3rd Country with Highest Doses of COVID19 Vaccine administered. More than 57.75 lakh beneficiaries vaccinated against COVID19. Daily Deaths less than 80 in the last 24 hours, lowest in 9 months. No COVID19 deaths in 17 States/UTs in last 24 hours. Jai Bharat!
— Anand Narasimhan (@AnchorAnandN) February 7, 2021
सुरूवातीच्या काळात, भारतात कोविड महामारीचे सर्वात भयंकर रूप पहावे लागेल, मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील असे भाकीत करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारच्या वेळीच घेण्यात आलेल्या खबरदारीच्या विविध उपायांमुळे तसेच मोठ्या प्रमाणात राबवल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेमुळे भारतातील कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात आली आहे.