युक्रेन संकटामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या बहुपक्षीय हवाई सरावात सहभागी न होण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाने घेतला आहे. ‘कोब्रा वॉरियर’ नावाचा हा सराव ६ ते २७ मार्च दरम्यान ब्रिटनमधील वॉडिंग्टन येथे होणार आहे. भारताने तीन दिवसांपूर्वी सरावासाठी पाच तेजस लढाऊ विमाने पाठवण्याची घोषणा केली होती मात्र आताची युद्धाची परिस्थिती लक्षात घेता भारतीय हवाई दलाने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय हवाई दलाने शनिवारी सकाळी ट्विट केले की ” अलीकडील घडामोडी लक्षात घेऊन यूकेमध्ये कोब्रा वॉरियर सराव २०२२ साठी भारतीय हवाई दलाने सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे.”
मात्र, नंतर ते ट्विट काढून टाकण्यात आले. ट्विट काढून टाकण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नसले तरी, या सरावात सहभागी न होण्याचा निर्णय कायम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. “भारतीय हवाई दल ‘कोब्रा वॉरियर’ सरावात सहभागी होत नाही,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कीव आणि इतर महत्त्वाच्या शहरांच्या दिशेने रशियन सैन्याच्या वाटचालीमुळे युक्रेनमधील गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण
युक्रेनहून येणारे भारतीय ९ वाजता येणार भारतात
कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी
रशिया – युक्रेन युद्धात युक्रेनची पहिली महिला पायलट ठार
काय आहे कोब्रा वॉरियर सराव?
‘कोब्रा वॉरियर’ हा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव आहे. जो युनायटेड किंगडममध्ये रॉयल एअर फोर्स (RAF) द्वारे एका दशकाहून अधिक काळापासून सुरु आहे. हा सराव विमान चालकांसाठी सर्वात आव्हानात्मक प्रशिक्षण देतो. तसेच या सरावाचा मुख्य उद्देश युद्ध क्षमता वाढवणे आणि मैत्रीचे बंध निर्माण करणे असतो.