भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या महिलांच्या कसोटी सामन्यात शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. स्मृती बातमी प्रसिद्ध होत असताना नाबाद १२६ धावांवर खेळत होती. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्यामुळे स्मृतीवर सध्या भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये ही कसोटी सुरू आहे. प्रकाशझोतात खेळविली जाणारी ही एकमेव कसोटी असेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यात स्मृतीने जबरदस्त कामगिरी करत शतक ठोकले. २१५ चेंडूंत तिने या १२६ धावा केल्या असून त्यात २२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तिच्या या शतकामुळे भारताने १ बाद १९५ अशी धावसंख्या गाठली आहे. पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला होता. पण भारताने १ बाद १३२ धावा केल्या होत्या. त्यात स्मृतीच्या ८० धावांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी तिने शतक पूर्ण केले. तिच्यासोबत पूनम राऊत ३० धावांवर नाबाद खेळत आहे.
याआधी स्मृतीची ७८ धावांची खेळी ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी होती.
हे ही वाचा:
मुख्य सचिव कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडेंना सीबीआयचे बोलावणे
न्यायालयात गाजणार ठाण्यातील खड्डे! जनहित याचिका दाखल
‘डी’ गँगचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी एनसीबी तत्पर
शशी थरूरदेखील सिब्बल यांच्या समर्थनार्थ मैदानात
याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात सर्वच शतकी खेळी या प्रतिस्पर्धी संघ म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या आहेत. स्मृती इंग्लंड सोडून अन्य देशाची पहिलीच खेळाडू आहे, जिने शतक ठोकले आहे.
ऑस्ट्रेलियातील या शतकी खेळींची यादी अशी-
मिर्टल मॅकलॅगन (इंग्लंड, १९३५) ११९
मॉली हाइड (इंग्लंड, १९४९) ना. १२४
सिसिलिया रॉबिन्सन (इंग्लंड, १९५८) १०२
एनिड बेकवेल (इंग्लंड, १९६८) ११३
एडना बार्कर (इंग्लंड, १९६९) १००
जॅनेट ब्रिटिन (इंग्लंड, १९८४) ११२
चार्लोट एडवर्डस (इंग्लंड, २०११) ना. ११४
स्मृती मानधना (भारत, २०२१) खेळत आहे १२६