मुंबईत पाहायला मिळतात ‘पांढरे हत्ती’

मुंबईत पाहायला मिळतात ‘पांढरे हत्ती’

मुंबई महापालिकेने सध्या स्कायवॉक बांधण्याचे काम सुरू केले आहे. सध्या पालिकेकडून बोरोवली आणि जोगेश्वरी येथील स्कायवॉकचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकचा वापर पादचाऱ्यांकडून फारच कमी प्रमाणात केला जातो. मालाड येथील स्कायवॉकला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तेथील काम बंद झाले आहे. नागरिकांची मागणी नसतानाही हे स्कायवॉक का बांधले जात आहेत, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सन २००८ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजने अंतर्गत रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १२ वर्षांत एमएमआरडीएने २८ स्कायवॉक बांधले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सात, तर कल्याण डोंबिवली महापालिकेने एक स्कायवॉक बांधला आहे. एमएमआरडीएने तेव्हा एक हजार कोटींहून अधिक खर्च स्कायवॉक बांधणीसाठी केला होता. ह्या स्कायवॉकवरून दिवसाला १५ लाख पादचारी प्रवास करत असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

हे ही वाचा:

काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी

ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

माझा कोणावरही विश्वास नाही

तालिबानचे हजारो दहशतवादी लवकरच पंजशीरमध्ये जाणार?

सध्या या स्कायवॉकचा वापर फारच कमी होत असल्याचे चित्र आहे. पादचाऱ्यांपेक्षा या स्कायवॉकचा वापर भिकारी, गर्दुल्ले, प्रेमीयुगुले, बेघर हेच जास्त करत असल्याचे समोर आले आहे. आवश्यकता नसतानाही स्कायवॉक बांधणे आणि भ्रष्टाचार अशा आरोपांमुळे योजना वादात सापडली आणि त्यानंतर नवीन स्कायवॉकचे कामही कमी झाले. आता तेच काम पुन्हा पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.

पालिकेने आता मुंबईत पाच ठिकाणी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार आणि नागरिकांकडून स्कायवॉकला विरोध होत आहे. मालाडमधील स्कायवॉकचे काम नागरिकांनी आंदोलन करून बंद पाडले. स्कायवॉकमुळे लोकांच्या अडचणीत वाढ होणार असून स्कायवॉकची गरज नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश फरकासे यांनी दिली आहे. स्कायवॉकमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एमएमआरडीएने पालिकेला मुंबईतील २३ स्कायवॉक हस्तांतरित केले असून त्याची वार्षिक देखभाल दुरुस्ती पालिका करते. कुर्ला व वांद्रे पूर्व स्कायवॉकचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, असे मुंबई महापालिकाचे उपमुख्य अभियंता (रस्ते) सतीश ठोसर यांनी सांगितले.

Exit mobile version