जुलैमधील पावसाने मुंबईला झोडपल्यावर शहरातील अनेक रस्त्यांची सत्यस्थिती समोर आली. अनेक महामार्गांवरील पथदिवे बंद आहेत आणि त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. अपघातांची संख्याही त्यामुळे वाढली आहे. इतर गुन्हेही घडण्याची शक्यता वाढली आहे.
सायन- पनवेल मार्गावरील काही भागांमध्ये पथदिवे बंद पडले आहेत. बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे या मार्गावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. सहा वर्षांपूर्वी काम झालेल्या या रस्त्याची अवस्था पाहून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबई महापालिकेने या मार्गावरील बहुतांश भागातील पथदिव्यांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. पथदिव्यांपाशी प्रशासनाला जाहिरात लावण्याचे हक्क देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर फारशी इच्छा दाखवली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर एका आठवड्यात त्यांचा निर्णय कळवेल. सर्वेक्षणानुसार शंभरहून अधिक पथदिवे नादुरुस्त आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.
हे ही वाचा:
चला, जुन्या गाड्या लवकर भंगारात काढा!
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले
सार्वजनिक बांधकाम विभागाने पथदिव्यांचे देयक देऊन मगच ही जबाबदारी आमच्यावर सोपवावी. माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलणं झालं आहे आणि अशी आशा आहे की या समस्येवर लवकरच तोडगा निघेल, असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाबद्दल वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. या मार्गावरील काही ठिकाणचे खड्डे बुजवण्याचा मानस आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ओमप्रकाश परदेसी यांनी सांगितले. पथदिव्यांच्या समस्येवर लवकरच निर्णय होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी सांगितले.
सायन- पनवेल मार्ग हा दक्षिणेकडील राज्यांना आणि मुंबईला जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. १,२३० कोटींचा खर्च करूनही वाहन चालकांकडून या मार्गाविषयी तक्रारी येतच असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या मार्गावर दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.