खय्याम यांच्या पत्नी व ज्येष्ठ गायिका जगजीत कौर कालवश

खय्याम यांच्या पत्नी व ज्येष्ठ गायिका जगजीत कौर कालवश

ज्येष्ठ गायिका जगजीत कौर यांचे रविवारी सकाळी सहा वाजता जुहू येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. जगजीत कौर या प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांच्या पत्नी होत्या. कौर यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘शोला और शबनम’ चित्रपटातील ‘पहले तो आँख मिलाना’, ‘बाजार’ चित्रपटातील ‘देख लो आज हमको  जी भर के’ तसेच ‘शगुन’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांतील त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या खास मनात राहतील. होशियारपूरपासून जवळच एका समृद्ध कुटुंबामध्ये जगजीत कौर यांचा जन्म झाला होता. कुटुंबामध्येच संगीताची आवड होती आणि त्या लहानपणी जालंधरमध्ये हरवल्लभ मेळ्यामध्ये अनेक दिग्गज गायकांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत असत. तिथून निर्माण झालेली गायनाची आवड आणि गायिका बनण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीच्या काळात त्या पंजाबी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करत असत. ५० च्या दशकात त्यांनी त्यांच्या संगीतातील कारकिर्दीला सुरुवात केली.

हे ही वाचा:

आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान

मल्लखांबाचा ऑलिम्पिक मार्ग व्हाया जपान

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

‘पोस्टी’ (पंजाबी सिनेमा), ‘खोज’, ‘दिल हे नादान’ या चित्रपटांसाठी त्यांनी गायन केले. इतर गायाकांसोबत त्यांनी भारताच्या अनेक भागात कार्यक्रम केले. त्यांनी खय्याम यांच्याकडे फारशी गाणी गायली नाहीत. जी काही थोडीफार गायली ती निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्या विनंतीमुळे गायल्याचे त्यांनी खय्याम यांच्यावरील चरित्रग्रंथात स्पष्ट केले आहे. त्यांनी समकालीन गायीकांप्रमाणे खूप गाणी गायली नाहीत पण काही निवडक गाणी मात्र त्यांची आजही लक्षात राहण्यासारखी आहेत. ‘खय्याम जगजीत कौर केपीजी चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेअंतर्गत त्यांचे सामाजिक कार्यही सुरू होते.

Exit mobile version