राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वाढदिवसाबरोबरच आज भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचाही वाढदिवस साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या या दोन्ही महापुरुषांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी झाला होता. लाल बहादूर शास्त्री यांची आज १८८वी जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. लाल बहादूर शास्त्री यांना काशीचे ‘लाल’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या राहणीमानातील साधेपणा आजच्या राजकारण्यांना खूप काही शिकवून जातो.
लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी देवी होते. १९२८ मध्ये त्यांचा विवाह मिर्झापूर येथील रहिवासी गणेश प्रसाद यांची मुलगी ललिताशी झाला. त्यांना दोन मुली आणि चार मुलगे अशी सहा मुले होती.
भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी शास्त्रीजींनी विशेष योगदान दिले आहे. १९२० साली शास्त्रीजी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या अनेक चळवळींमध्ये शास्त्रीजींनी महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावली. या चळवळींपैकी मुख्य म्हणजे १९२१ चे असहकार आंदोलन, १९३० चा दांडी मार्च आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन अशा महत्त्वपूर्ण आंदोलनात ते सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही… का म्हणतोय काँग्रेसचा नेता?
“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी
राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू
… म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून!
शास्त्रीजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे ते त्यांच्या आईसह मिर्झापूरला रहायला गेले. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यावेळी फारच कमी गावांमध्ये शाळा असल्यामुळे शिक्षण मिळवण्यासाठी त्यांना अनेक काठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते. अनेक अडथळे पार करून त्यांनी कधीही खचून न जाता आपले शिक्षण पूर्ण केले. जातीव्यवस्थेला विरोध दर्शवून त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी स्वतःचे ‘श्रीवास्तव’ हे आडनाव त्यागले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ‘शास्त्री’ म्हणजेच विद्वान, अशी पदवी देण्यात आली. वयाच्या १६ व्या वर्षी ते शिक्षण सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी शास्त्री स्वतंत्र भारताचे पोलीस आणि परिवहन मंत्री बनले. त्यांच्या कार्यकाळातच पहिल्यांदा महिला कंडक्टरची नियुक्ती झाली. त्यांनीच अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काठीऐवजी पाण्याच्या जेट्सचा वापर करावा, असा सल्ला सुचवला. शास्त्रीजींकडे शेवरले इम्पाला ही चारचाकी होती, जी त्यांनी फक्त सरकारी कामासाठी वापरली. एकदा त्यांच्या मुलाने ही गाडी वापरल्याचे जेव्हा शास्त्रीजींना कळले; तेव्हा त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला विचारले, की गाडी वैयक्तिक कारणासाठी किती अंतर वापरण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी सरकारी खात्यात तेवढ्या अंतराच्या इंधनाचे पैसे जमा केले. १९५२ मध्ये शास्त्री रेल्वेमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये, १९५६ मध्ये तामिळनाडूमध्ये एक रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात सुमारे १५० प्रवाशांनी आपला प्राण गमावला होता. या घटनेनंतर त्यांनी रेल्वेमंत्री पदावरून राजीनामा दिला.
सदैव देशाची सेवा करणारे जवान आणि देशाची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी त्यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नाराही दिला. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सांगण्यावरून फियाट गाडी खरेदी केली. त्या काळात त्या गाडीची किंमत १२ हजार रुपये होती, परंतु त्यांच्या बँक खात्यात फक्त ७ हजार रुपये होते. गाडी खरेदी करण्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून ५ हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आणि गाडी खरेदी केली. आता ती गाडी नवी दिल्लीतील शास्त्री स्मारक येथे ठेवली आहे.
१९६५ मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान देशात अन्नधान्याची कमतरता होती. देशाला अन्न कमतरतेच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींनी त्यांचा पगार घेणे बंद केले. या समस्येला देशातील नागरिकांनी एकीने तोंड दिले पाहिजे म्हणून त्यांनी देशवासियांना आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन केले. त्यांचे आवाहन स्वीकारून भोजनालय मालकांनी दर सोमवारी संध्याकाळी भोजनालयाचे दरवाजे बंद केले. लोकांनी एका वेळी उपवासही सुरू केला. देशवासी त्याला ‘शास्त्री व्रत’ म्हणू लागले.
लाल बहादूर शास्त्री १० जानेवारी १९६६ला ताश्कंदला गेले. पाकिस्तानशी झालेल्या शांतता कराराच्या संमतीनंतर काही तासांनी त्यांनी तेथे (११ जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. आजही त्यांचा मृत्यू एक गूढ मानला जातो. शास्त्रीजी हे पहिले भारतीय होते ज्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जीवनप्रवास हा साधेपणाचे एक उदाहरण आहे. आपल्या पदावर असताना त्यांनी नेहमी जनतेचे व त्यांच्या मनाचे ऐकले आणि आपले कार्य चालू ठेवले. त्यांनी राजकारणातही नैतिकतेला सर्वोच्च स्थानी ठेवले. असे व्यक्तिमत्त्व आजच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळते.