इंग्लंडमधील बर्मिगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची दमदार कामगिरी सुरूच असून दरदिवशी भारतीय खेळाडू पदक मिळवत आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदक तर दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या १३ वर गेली आहे.
भारताला वेटलिफ्टिंगमध्ये अजून एक रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सचा दबदबा कायम असून वेटलिफ्टर विजय ठाकूर याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. विकास ठाकूर याने ९६ किलो गटात स्नॅचमध्ये १५५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९१ किलो वजन उचलले. सामोआच्या डॉन ओपेलॉगने या प्रकारात ३४६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक
भारतीय बॅडमिंटनपटूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, पण अखेरच्या सामन्यात मलेशियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागले. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारत ३-१ च्या फरकाने पराभूत झाला.
मलेशियाविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीला एका चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आरोन चिया आणि वूयी यिक या जोडीने सात्विक आणि चिराग जोडीचा १८-२१, १५-२१ अशा फरकाने पराभव केला. ज्यामुळे मलेशियाने सामन्यात १-० ची आघाडी घेतली.
त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने मलेशियाच्या जिन गोहला २२-२० आणि २१-१७ अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला आणि भारताला सामन्यात १-१ ने बरोबरीत आणून ठेवलं.
हे ही वाचा:
बेस बॉलच्या स्टिकने उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडली
माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं
त्यानंतर सामना पुरुष एकेरीचा किदम्बी श्रीकांत आणि योंग यांच्यात पार पडला. या सामन्यात किदम्बी १९-२१, २१-६, १६-२१ च्या फरकाने पराभूत झाला. ज्यानंतर अखेरचा सामना ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीचा मुरलीथरन थिनाह आणि कूंक ली टॅन यांच्यात पार पडला. यामध्ये भारत १८-२१, १७-२१ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे सामना भारताने ३-१ ने गमावला.