I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला

I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला

अग्निपथ चित्रपटात मिथुन चक्रवर्तीचे एक धमाल कॅरेक्टर आहे. त्यात तो कृष्णन अय्यर एमए नावाचे पात्र निभावतो. मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरदेखील गुरुवारी कानपूर येथे सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भलताच चमकला. पदार्पणातच त्याने ७५ धावांची खेळी करून क्रिकेटचा पडदा व्यापला. त्याचीच चर्चा कसोटीच्या पहिल्या दिवशी होती.

श्रेयसने २ षटकार आणि ७ चौकारांच्या सहाय्याने ही ७५ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावांची खेळी केली.

सामन्याच्या प्रारंभी भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरला टोपी देत त्याला कसोटी पदार्पणासाठी शुभेच्छा दिल्या. गावस्कर यांच्याकडून टोपी घेतल्यानंतर त्याने चक्क पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकल्यामुळे त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मयंक अगरवाल १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल (५२) आणि चेतेश्वर पुजारा (२६) यांनी ६१ धावांची भागीदारी केली आणि ही जोडी फुटली. गिलला जॅमिसनने त्रिफळाचीत केले. नंतर पुजारा २४ धावांची भर घातल्यानंतर बाद झाला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही (३५) जॅमिसनचा बळी ठरला. त्यामुळे ४ बाद १४५ अशा बिकट अवस्थेत भारतीय संघ होता. पण श्रेयस आणि रवींद्र जाडेजा (ना. ५०) यांनी भारताला सावरले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करत भारताला ४ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडचा गोलंदाज जॅमिसन याने ३ बळी घेत भारताला हादरा दिला.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या गडाला सुरुंग! रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह भाजपामध्ये

१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट

परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

 

अजिंक्य रहाणेच्या बाबतीत आज कमाल झाली. तो सलग दोन चेंडूंवर दोनवेळा बाद दिला गेला. प्रथम त्याला पंचांनी बाद दिले तेव्हा त्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि त्याला पंचांनी नाबाद ठरविले. पण पुढच्याच चेंडूवर जॅमिसनने त्याला त्रिफळाचीत केले.

स्कोअरबोर्ड : भारत पहिला डाव ४ बाद २५८ (श्रेयस अय्यर खेळत आहे ७५, रवींद्र जाडेजा खेळत आहे ५०, शुभमन गिल ५२, अजिंक्य रहाणे ३५, जॅमिसन ४७-३) वि. न्यूझीलंड

Exit mobile version