अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. लास वेगास येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये बुधवार, ६ डिसेंबर रोजी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात संशयित आरोपीचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
नेवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक व्हिन्सेंट पेरेझ यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कॅम्पसमध्ये अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. किमान सात ते आठ वेळा गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज ऐकताच गोंधळ उडाला आणि सर्वजण विद्यापीठात पळाले. त्यानंतर कळालं की खरोखर गोळीबार होत आहे आणि कॅम्पसमध्ये बंदुकधारी व्यक्ती फिरत आहे.
लास वेगास येथील स्थानिक रुग्णालयात तीन मृतांसह एका गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार करणारा व्यक्तीही मृतावस्थेत सापडला आहे. पोलिसांबरोबरच्या चकमकीत संशयिताचा मृत्यू झाला की त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही, अशी माहिती लास वेगास पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली.
हे ही वाचा:
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत ‘गरब्याची’ नोंद!
पाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव
निफ्टीची जाहिरात चक्क कोरिया रेल्वे स्टेशनवर झळकली आणि…
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत रवी बिश्नोई अव्वल
मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठ रिकामं केलं. अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॅम्पसमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे, याबाबतचं वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलं आहे. स्थानिक पोलिसांकडून याची माहिती देण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास अद्याप सुरू आहे.