अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडत आहेत. अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. यावेळी अमेरिकेतील रुग्णालयात गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात चार जण ठार झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गोळीबार करणाऱ्याला देखील ठार केले आहे.
अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथील तुळसा शहरातील सेंट फ्रान्सिस रुग्णालयात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. येथील जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत गोळीबार करणारा अज्ञात व्यक्तिदेखील ठार झाला आहे. सध्या हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. गोळीबार करताना हल्लेखोराने बंदूक आणि रायफलचा वापर केला. या घटनेनंतर सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलची नताली बिल्डिंग बंद करण्यात आली आहे.
अमेरिकेतील शिथिल शस्त्र परवाना कायद्यामुळे तिथे अनेकदा गोळीबाराच्या घटना समोर येतात. ज्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो. २४ मे रोजी उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात १९ मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला होता. यावर चिंता व्यक्त करताना अध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की, आता या दिशेने कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा:
‘अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी नगर’ करा’
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार
दरम्यान, अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. तुळसा येथील गोळीबाराच्या एक दिवस आधी, मंगळवारी न्यू ऑर्लिन्सच्या पदवीधर दीक्षांत समारंभात गोळाबार झाला होता. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.