वडील उमादत्त शर्मा यांचे स्वप्न होते की, आपल्या मुलाने जम्मू-काश्मीरच्या लोकसंगीतातील वाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतूरला लोकप्रियता मिळवून द्यावी. त्यांच्या सुपुत्राने या वाद्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. उमादत्त शर्मा यांचा हा सुपुत्र म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा. वयाच्या ८४व्या वर्षी या महान संतूरवादकाचे निधन झाले आणि संतूरचे स्वरच स्तब्ध झाले. पण त्यांनी संतूरला दिलेली जगन्मान्यता कधीही पुसली जाणार नाही.
संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर या संगीतात आपल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. त्यामुळे आपण जीवनभर असेच संगीत लोकांना ऐकवत राहू ज्यातून लोक स्वतःलाही विसरून जातील, असा पंडित शिवकुमार शर्मा यांचा विश्वास होता. त्यांचे ते स्वप्न पूर्णही झाले. एक राग त्यांनी संतूरवर छेडला आणि समोरचे श्रोते ध्यानस्थ झाले, शांत झाले. तो शांतचित्त श्रोतृवर्ग शिवकुमार यांनी अनुभवला. यापेक्षा आपल्याला आणखी काय हवे, असे त्यांना वाटले.
शिवकुमार यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ला जम्मूमध्ये झाला. त्यांना संगीताची ओळख झाली ती तबलावादनातून. सरोद, हार्मोनियम अशी वाद्येही मग ते वाजवू लागले. वयाच्या १४व्या वर्षी त्यांचे वडील उमादत्त यांनी त्यांना संतूरची ओळख करून दिली. त्यानंतर मात्र संतूर हे वाद्य त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. त्यावरच त्यांनी आयुष्यभर संगीतसाधना केली. त्यात असंख्य प्रयोग केले, संशोधन केले.
‘अंतर्ध्वनी’ या रागाची निर्मितीही त्यांनी स्वतःचाच शोध घेताना केली. ते म्हणतात की, शंभरएक राग आज संगीतात आहेत. त्यामुळे पुन्हा नवा राग निर्माण करण्याची गरज काय, असे मला वाटत होते. पण मला जगभर प्रवास करताना मला लोकांनी विनंती केली की, तुम्ही अशी एखादी रचना करा की आम्हाला ध्यानसाधनेसाठी त्याचा उपयोग होईल. तेव्हा मी विविध रांगाचा अभ्यास करत असताना मला या नव्या रागाचा शोध लागला. मी काही दिवस त्याचा अभ्यास करत राहिलो. पण तेव्हा त्याला नाव दिले नव्हते. पण ते माझ्या मनातील संगीत असल्यामुळे मी त्याला अंतर्ध्वनी असे नाव दिले. संगीत हे केवळ त्या वाद्यातून उमटत नाही तर ते हृदयातून यायला हवे यावर शिवकुमार यांची नितांत श्रद्धा होती. तसेच संगीतावर पकड मिळविण्यासाठी अफाट साधना, रियाझ यांची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ते एका मुलाखतीत म्हणतात की, लोक माझ्या संतूरवादनाचा ध्यानधारणेसाठी, थेरपीसाठी रुग्णालयातही वापरतात. अनेक शल्यविशारदही माझ्या संगीताचा वापर उपचारासाठी करतात, हे मला अनेकवेळा जगभर प्रवास करताना सांगितले जाते. त्याचे मला आश्चर्य वाटते.
हे ही वाचा:
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार
नाना पटोलेही करणार अयोध्या वारी
पंजाब गुप्तचर कार्यालयावर आरपीजी हल्ला
राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन
शास्त्रीय संगीताला त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले असले तरी चित्रपट संगीतातही ते काही काळ रमले. अर्थात, काही मोजके चित्रपट सोडले तर त्यांनी शास्त्रीय संगीताच्या आराधनेला मात्र कधीही दूर सारले नाही. सिलसिलापासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीला प्रारंभ झाला. पण त्यांच्या अविट संतूरवादनाची झलक पाहायला आणि ऐकायला मिळाली ती झनक झनक पायल बाजे या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात. त्यानंतर त्यांचे मित्र आणि महान बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत त्यांची संगीतक्षेत्रातील मैफल रंगली. दोघांची भेट १९६१मध्ये झाली. पण तेव्हापासून संतूर आणि बासरीचे सूर जणू एकरूप झाले. सिलसिला, फासले, लम्हे, चांदनी, डर अशा चित्रपटांतील त्यांचे संगीत सदाबहार होते. आजही त्यातील प्रत्येक गाण्यात शिव-हरी या जोडीचा संगीतातील करिश्मा आपल्याला मंत्रमुग्ध करतो.
संतूर अँड गिटार, कॉल ऑफ द व्हॅली (हरिप्रसाद चौरसिया), व्हेन टाइम स्टूड स्टील (झाकीर हुसेन यांच्यासह), हिप्नॉटिक संतूर, राग भोपाली, राग केदारी, वर्षा : पर्जन्यदेवतेला वंदन, हरिप्रसाद यांच्यासह जुगलबंदी असे त्यांचे अनेक अल्बम गाजले. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात पद्मश्री (१९९१) आणि पद्मविभूषण (२००१) या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचा समावेश होता. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना १९८६मध्ये गौरविण्यात आले होते.
पंडित शिवकुमार यांचा विवाह मनोरमा यांच्याशी झाला होता आणि त्यांना दोन पुत्र आहेत. त्यातील राहुलने संतूरवादनाचे धडे पंडित शिवकुमार यांच्याकडून गिरविले आणि पुढे तेही एक निष्णात संतूरवादक म्हणून नावारूपाला आले. राहुल हा आपला शिष्य आहे, असे त्यांनी एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वी म्हटले होते. देवानेच आपल्याला ती भेट दिली आहे, असे त्यांनी नमूद केले होते.